Wednesday 23 April 2014

‘शाही’ शाई




   दुबार पेरणीची सवय असणाऱ्या दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला दुबार मतदानाचे सल्ले देणारे शरद पवार हे या देशाला कृषिमंत्री म्हणून लाभावेत हे या देशाचे दुर्दैव. दुबार मतदान करताना पहिल्यांदा बोटावर लावलेली शाई पुसायला मात्र विसरू नका असा पाचकळ इनोदही पवार साहेबांनी केला. असले पाचकळ इनोद करण्यात महाराष्ट्रात छोट्या पवारांचा कुणी हात धरणार नाही असा भल्या भल्यांचा जो समज होता त्या समजाचे रुपांतर या थोरल्या साहेबांच्या इनोदाने पार गैरसमजात करून टाकले. रोज बडबड करणारी व्यक्ती अचानक गप्प्प राहू लागली की काहीतरी गोम आहे हे समजते तसेच नेहमी गंभीर तत्वज्ञान झोडणारी व्यक्ती जेव्हा पांचट आणि पाचकळ इनोद करते तेव्हाही काहीतरी गोम नक्की आहे हे न समजण्याएवढा महाराष्ट्र दुधखुळा नाही. साने गुरुजींनी ‘श्यामची आई’ हे पुस्तक लिहिलेले वाचले होते परंतु महाराष्ट्रातील सुजाण नागरिकांना दुबार मतदानाची माहिती व्हावी म्हणून या श्याने गुरुजींनी ‘आमची शाई’ हे पुस्तक लिहायला घेतल्यास गारपिटीने ग्रस्त असणाऱ्या महाराष्ट्राला तेवढेच हसण्याची सवय तरी लागेल. तत्पूर्वी २५००० कोटींचा हिशेब सेबीला देण्यात अपयशी ठरलेल्या सहाराश्रीचे थोबाड कुणीतरी शाई फेकून काळे केले होते. परंतु सहाराश्रीने ती शाई जणू काही त्यांना विजयाचा कुमकुम तिलक लावला आहे अशा अविर्भावात मिरवलेली जगाने पाहिलेले आहे. तेवढ्यात ४९ दिवसातच सत्ता सुंदरीच्या संसाराला विटलेल्या केजरीवालांचेही तोंड कुणीतरी शाईने काळे केल्याचे वाचण्यात आले. अर्थात आमुच्या प्राणप्रिय भारत देशात सुनामी लाटा याव्यात तशा काही लाटा अधून मधून येत असतात. मागे राजकीय नेत्यांचे थोबाड फोडण्याची जणू काही स्पर्धा लागावी असे हल्ले नेत्यांवर होऊ लागले. मा.श्याने गुरुजी उर्फ शरद पवार यांना देशाच्या राजधानीत चपराक लगावण्यात आली आणि दिल्लीत आजही मराठ्यांची काय अवस्था आहे हे आम्हाला समजले. पी. चिदंबरम् यांच्यावर कुण्यातरी उपटसुंभाने चप्पल फेकली. परंतु या थोबाडफोड स्पर्धेचा क्लायम्याक्स मात्र अरविंद केजरीवालांच्या थोबाड फोडीने झाला हेही आपण याची देही याची डोळा अनुभवले.

     मागे दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर मेणबत्त्यांचा प्रचंड खप वाढला. ही मेणबत्त्यांची लाटही एवढी जोरात होती की ती पाहून अंबानी ग्रुपला काही काळासाठी नैसर्गिक वायूंचे साठे बंद करून मेणबत्ती उत्पादनात मुसंडी मारण्याची इच्छा झाल्याची एक बातमीही मध्यंतरी वाचण्यात आली. तत्पूर्वी अण्णा हजारेंनी भ्रष्टाचार मुक्तीचे आंदोलन करून देशाला आणि समाजाला “अण्णा” टोपी घातली. विशेष बाब म्हणजे याच टोपीला पूर्वी गांधी टोपी म्हणून नावाजल्या जायचे आणि तीला सोन्याचे दिवस आणणाऱ्या आण्णांना आधुनिक गांधी म्हणून नावाजले जाऊ लागले. असे हे गांधी आणि अण्णांचे साटेलोटे आहे. तर या अण्णा उर्फ गांधी टोपिंची एवढी जोराची लाट आपल्याकडे आली की कित्येक ठिकाणी नवजात बाळाचे बारसे करताना त्याच्या डोक्यावर ही अण्णा उर्फ गांधी टोपी घालण्याची प्रथाच पडलीय म्हणे. म्हणजे ते बाळ आयुष्यभर इतरांना टोप्या घालायला मोकळे. जाऊ द्या, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात हेच खरे. असो. तर सध्याच्या निवडणुकीच्या या धामधुमीत शाईने जिथे हक्काने बोट काळे करून घ्यायला भारतीय समाज तयार झाला तिथे एका शाई प्रकरणाने मात्र महाराष्ट्राला आणि सबंध देशाला चांगलेच हादरवून सोडले व मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझ्याच बापाचा म्हणणाऱ्यांना घाम फुटला.

    त्याचे झाले असे की दि. १० एप्रिल २०१४ रोजी सातारा जिल्ह्यातील पाटण येथे सरदार पाटणकर यांच्या घराण्यासंदर्भात लिहिलेल्या एका पुस्तकाचे प्रकाशन बाबा पुरंदरे यांच्या हस्ते होते. या कार्यक्रमासाठी कोल्हापूरचे शाहू महाराज, सातारचे शिवाजीराजे भोसले, आमदार विक्रमसिंह पाटणकर आदी ‘शाही’ मंडळींची उपस्थिती होती. हा शाही प्रकाशन सोहळा आटोपून परत निघाल्यानंतर बाबा पुरंदरे यांना पुष्पहार घालण्याच्या निमित्ताने आलेल्या सुयोग औंधकर या बहाद्दर तरुणाने पुरंदरे यांना आधी पुष्पहार घालून नंतर शाईचा प्रसाद दिला. कायम सत्काराचे हारेतुरे मिरवण्याची सवय झालेले पुरंदरे या शाई फेकीमुळे काही काळ हडबडून गेले. अर्थातच पुरंदरे यांच्या लिखाणाची जातकुळी कोणती आहे हे आता महाराष्ट्रातील शेंबड्या पोरालाही माहित झाल्यामुळे या ‘शाही’ शाई फेकीमुळे समाजाच्या कोणत्याही स्तरातून साध्या निषेधाचे सूरही उमटले नाहीत. उलट बरे झाले एकदाचे पुरंदरेचे तोंड काळे झाले इथपासून ते हा प्रकार २००३-०४ सालीच व्हायला हवा होता इथपर्यंतच्या प्रतिक्रिया महाराष्ट्रभरातून ऐकायला मिळाल्या. स्वतःचे रक्त सांडून जगाला हेवा वाटावा असा इतिहास मराठ्यांनी निर्माण केला मात्र पुरंदरे आणि कंपूने त्यांच्या हातातील लेखणीच्या आणि त्या लेखणीतील शाईच्या जोरावर वारंवार मराठ्यांचा इतिहासाला डांबर फासले. त्यामुळे अशांचे तोंड काळे करणे ही एक सामाजिक आणि नैतिक जबाबदारी होऊन बसली होती ती सुयोग औंधकर या तरुणाने पार पडली. हे महत्कार्य करण्यासाठी सुयोगने जे धाडस दाखवले त्याबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

     खरे तर या निमित्ताने असे प्रकार का होत आहेत याचा समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून अभ्यास करण्याची संधी पुन्हा एकदा चालून आली आहे. परंतु आपल्या पराशुरामापासून ते नथुरामापर्यंतच्या सोनेरी परंपरेला जपत; हाती असलेल्या प्रसार माध्यमांचा वापर वेश्येसारखा करत; ब्राह्मणवादी कंपूने सुयोग औंधकर या तरुणाला तत्काळ शाहिस्तेखान ठरवून टाकले. भांडारकर हल्ला प्रकरणीही संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेला या मंडळींनी असेच तालिबानी ठरवून टाकले होते. या मनुवादी मंडळींच्या म्हणण्यानुसार असली कृत्ये ही तालिबानी किंवा शाहिस्तेखानी वृत्तीची असतील तर या लोकांनी विचार केला पाहिजे की असे कृत्ये करण्यासाठी कुणाचेही पाठबळ नसताना, कुणाची फूस नसताना अगदी उत्स्फूर्तपणे स्वताची कसलीच पर्वा न करता तथाकथित ज्ञानतपस्व्यांचे आणि ज्ञानभांडारांचे तोंड काळे करणारे लोक समाजात का तयार होत आहेत? इतिहासावर अनेक लोक लिहीत असताना औन्धकरच्या हातातील शाईला नेमके पुररंदरेचेच तोंड का काळे करावे वाटले? हा गंभीर चिंतनाचा विषय आहे. जर पुरंदरेच्या तोंडावर शाई फेकणारा सुयोग औंधकर शाहिस्तेखान असेल तर त्याने तोंड काळे केलेला बाबा पुरंदरे हा  इतिहास लेखनातील नक्कीच औरंगजेब असला पाहिजे. संभाजी ब्रिगेड सारख्या सामाजिक संघटना जर तालिबानी असतील तर भांडारकर सारख्या संस्था मोगलाईचे अड्डे असले पाहिजेत. म्हणून जो पर्यंत असल्या औरंगजेबांचा आणि त्यांच्या मोगलाई अड्ड्यांचा बंदोबस्त होत नाही तो पर्यंत समाजात असे शायिस्तेखान निर्माण होतच राहतील आणि त्याला सर्वस्वी जबाबदार पुरंदरे आणि असल्या प्रवृत्तीला पाठीशी घालणारी जातीयवादी वृत्तपत्रेच असतील हे आपण पहिल्यांदा समजून घेतले पाहिजे. पुरंदरेसारख्या जेष्ठ साहित्यिकावर(?) शाईफेक होते आणि समाज दातखिळी बसल्या सारखा गप्प राहतो यामागे ही वरील कारणे आहेत. 
     
     विरोधकांना गप्प करणे याचा अर्थ त्याचा गळा दाबणे असा होत नाही हे सुयोग औंधकरला पण माहिती आहे परंतु आपण काहीही लिहिले तरी आपले कुणीही वाकडे करूच शकत नाही अशा अविर्भावात वावरणार्यांना किमान सुयोग औंधकरच्या बाटलीतील शाईची तरी भीती असली पाहिजे की नाही? मुद्द्याला उत्तर गुद्दा असूच शकत नाही हे कुण्याही सुसंस्कृत मनुष्याला समजणारे  तत्वज्ञान आहे परंतु इतिहास लेखन करत असताना तो मुद्देसूद न लिहिता वास्तवाचे मुडदे पाडत लिहिला जात असेल तर अशा वेळी गुद्दे जरी वापरायचे नसले तरी ४-५ रुपयात कुठल्याही जनरल स्टोअर्समध्ये भेटणारी शाई वापरणे गरजेचे ठरते. वैचारिक लेखन करत असताना विचारांचे उत्तर विचारांनी देणे हे केव्हाही संयुक्तीकच आहे परंतु वैचारिक लेखनाच्या नावाखाली जर कुणी कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळत एखाद्या समाजाच्या इभ्रतीलाच हात घालत असेल तर अशा खटनटाशी वैचारिक युक्तिवाद करणे हे वेळेचा अपव्यय ठरते. म्हणून अशा विकृत आणि तथाकथित ज्ञानतपस्व्यासाठी शाईचा वापर हा केवळ कागदावरच करायचा नसून ती शाई पायातील पायताणाला लावून त्या पायताणाचे पलिते असल्या विकृत वीरांच्या तोंडावरून फिरवायलाच हवेत. तरी बरे औंधकर या तरुणाने ती शाई पायताणाला लावली नव्हती. परंतु या पुढे महाराष्ट्रात असले कुणी निपजणारच नाही या भ्रमात कुणीही राहू नये.
    
    स्वतःची अस्मिता दुखावली की व्यक्ती कोणत्याही टोकाला जातो ही त्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. इकडे ऐतिहासिक विकृती करणाऱ्या पुरंदरेचे तोंड काळे होते न होते तोच प्रधानमंत्री पदाचे बाशिंग गुढग्याला बांधून देशाचे नेतृत्व करण्याचे डोहाळे लागलेल्या नरेंद्र मोदींच्या गुजरातेत शिवरायांच्या बदनामीचे प्रकरण पुढे आले आहे. जेम्स लेन नामक शिवद्रोह्याने शिवरायांचे पितृत्व दादू कोंडदेव या चपराश्याकडे देण्याचे पाप केले होते परंतु गुजरात मधील शिक्षण मंडळाने या चपराशाला शिवरायांच्या बापाचाही बाप म्हणजेच आजोबा दाखवण्याचे महापाप केले आहे. इयत्ता ७वी ला असणाऱ्या 'सोशल सायन्स' या पुस्तकात पृष्ठ.क्र. ५९ वर, "मोगल साम्राज्याचा सुवर्णकाळ आणि ऱ्हास" या सहाव्या प्रकरणात ही प्रस्तुतची बदनामी छापून आली आहे. एवढेच नव्हे तर शिवरायांचा जन्म १६०३ साली शिवनेरी या राजवाड्यात झाल्याचे लिहून गुजरात शिक्षण मंडळाने आपली बौद्धिक दिवाळखोरीही जाहीर केली. अमेरिकन व्यक्तीच्या नथीतून बाण मारत दादू कोंडदेवाला शिवरायांच्या पितृस्थानी दाखवण्याचे कारस्थान महाराष्ट्रात अयशस्वी झाले परंतु हाती असलेल्या सत्तेच्या मुजोरीवर गुजरातेत मात्र ही विकृती शालेय अभ्यासक्रमात घुसडण्यात आली. देशाची सूत्रे मोदींच्या हाती दिल्यास इतिहासावर कोणती वेळ येईल याचीच ही झलक म्हणायला हवी. म्हणूनच युगनायक पुरुषोत्तम खेडेकर साहेब म्हणतात- “बहुधा महाराष्ट्रात या जेम्स लेन प्रवृत्तीच्या लोकांना काही करता येत नसल्याने गुजरातेत ते आपले विकृत मनोरथ तडीस नेत असतील.”
    
     गेल्या काही दिवसांपासून आपल्या सभांच्या माध्यमातून नरेंद्र मोदी वारंवार चुकीचे ऐतिहासिक दाखले देत आहेत. ज्यांच्या राज्यातील पाठ्यपुस्तकेच चुकांनी भरलेली असतील ते नेते जाहीर सभेत काय दिवे लावतील हे सांगायला ज्योतिषाची गरज नसून त्यासाठी मोदींची एखादी सभाच पुरेशी आहे. त्यात पुन्हा रायगडला भेट दिल्यानंतर आजपर्यंत आम्हाला चुकीचा इतिहास सांगण्यात आल्याची वल्गना करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असा प्रकार आहे. खरे तर मोदी साहेब यांच्या रायगडावरील भाषणाने पुरंदरे आणि कंपूच्या मनात चलबिचल झाली असणार. ती अंतर्गत चलबिचल चव्हाट्यावर आणण्याचे काम सुयोग औंधकर या तरुणाने केले. म्हणून नरेंद्र मोदिन्साहित त्यांना प्रधानमंत्री पदासाठी पुढे करून मतांची भिक मागणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघाच्या दावणीला बांधलेल्या प्रसार माध्यमांनी सुयोग औंधकर याचे आभार मानायला हवेत.
 

     बाकी सुयोग औंधकर यांच्या कृत्याला कुणी काय समजावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु “तोंडावरील शाई पाण्याने धुतल्यानंतर निघूनही जाईल पण आपल्या हाती असणाऱ्या लेखणीतील शाईच्या जोरावर आमच्या इभ्रतीवर केलेली शाईफेक आम्ही कशी धुवून काढावी?” या सुयोगला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मात्र कुणाकडेही नाही.  

No comments:

Post a Comment