Monday 30 March 2015

तुकारामांचा कार्यकर्त्यान्ना उपदेश

तुकारामांचा कार्यकर्त्यान्ना उपदेश

जागृतिचा अग्नी सतत तेवत ठेवा असे भारतरत्न बाबासाहेब अम्बेडकरान्नी सांगून ठेवले आहे. कोणत्याही चळवळीतील लोक जेव्हा समाजात जागृती करण्यासाठी अथवा आपल्या विचारमतांचा प्रचार- प्रसार करण्यासाठी जातात तेव्हा साहजिकच त्यान्ना विरोध होतो. हा विरोध प्रस्थापित असणार्यांकडून होणे एकवेळ समजू शकते परंतू पहिला विरोध हा आपल्याला आपल्या घरातून, आपल्या जवळच्या लोकांकडूनच होतो. विरोध झाला म्हणजे प्रचारकाची खरी कसोटी असते. अशावेळी लगेच त्याला हमरीतुमरीवर यायला जमत नाही आणि असे करून विचारधारेचा प्रचार आणि प्रसार होतही नाही. जेव्हा आपलेच लोक आपल्याला विरोध करतात तेव्हा प्रचारकाचे कौशल्य पणाला लागते. बरे हे लोक काही जाणीवपुर्वक असा विरोध करत नाहीत तर हा विरोध ते केवळ अद्न्यानापोटी करतात. ब्राह्मणी व्यवस्थेने बालपणापासून त्यांच्यावर जे चुकीचे संस्कार केलेले असतात त्यामुळे आपण सांगत असणारे विचार त्याला पचवणे जड जाते. आपल्या प्रावाहविरोधी विचारान्नी त्याचा अहंकार दुखावतो आणि तो हमरीतुमरीवरही येउ शकतो. बरे अशा लोकान्ना वगळून पुढेही जाउ शकत नाही कारण आपला हा विचार त्याच्याच तर कल्याणाचा असतो. म्हणून चळवळीत कार्य करताना प्रत्येक कार्यकर्त्याने " माणसे तोडायची नाहित आणि तत्वे सोडायची नाहित " हे सूत्र ध्यानात घेतले पाहिजे. कारण माणसेच नसतील तर नुसत्या विचारांचे, तत्वांचे आणि सिद्धांतांचे काय लोणचे घालायचे काय?

जेव्हा अशी वादसदृष्य परिस्थीती निर्माण होते तेव्हा वादकाने कसे वागले पाहिजे याचे फार उत्तम मार्गदर्शन तुकोबारायान्नी आपल्याला केलेले आहे. वाद आणि वादक यांच्या संदर्भात फार मोलाचे असे मार्गदर्शन तुकोबान्नी खालील अभंगात केलेले आहे. तुकोबाराय म्हणतात-
हेचि वादकाची कळा/ नाही येउ देत बळा//
धीर करावा करावा/ तरि तो आहे आम्हा देवा//
रिघावे पोटात/ पाया पडोन घ्यावा अंत//
तुका म्हणे वरि/ गोडा आणावा उत्तरी// (अ.क्र.3677)

प्रस्तूत अभंगात तुकोबाराय सांगतात की वाद करणाराचे, चर्चा करणाराचे हेच खरे कौशल्य आहे की त्याने आपल्या प्रतिस्पर्ध्याला अर्थात आपण ज्याच्याशी वाद घालतो आहोत त्याला आपण बळजोरीवर येउ दिले नाही पाहिजे. वाद करणार्याने भरपूर धीर धरला पाहिजे. कारण मत परिवर्तन हे एका झटक्यात होणारे कार्य नाही. त्याला थोडा वेळ लागणारच. आणि असे असेल तर हे पांडूरंगा असा धीर हा आमचाकडे आहे असे तुकोबाराय देवाला अर्थात पांडूरंगाला म्हणतात. वाद घालणार्याने नेहमी सयम पाळायला हवा असेच तुकोबा उपरोक्त अभंगातून सुचित करत आहेत. पुढे ते म्हणतात; वाद घालणार्या व्यक्तिच्या आपण पोटात शिरायला हवे, त्याचा पुरेपूर विश्वास सम्पादन करायला हवा, वेळप्रसंगी त्याच्या पायाही पडायला हवे आणि त्याच्या मनाचा अंत काढून घ्यायला हवा. तो किती पाण्यात आहे, त्याचे द्न्यान कुठपर्यंत आहे याचा अंदाज काढून घ्यावा. अर्थात हे सगळे त्याला मारून मुटकून किंवा त्याच्या उरावर बसून करू नये तर अत्यंत नम्रतेने आणि कौशल्याने हे करावे असे तुकोबान्ना वाटते. आणि एकदा का त्या व्यक्तिच्या मनाचा अंदाज आला, त्याची कुवत समजली, त्याच्या मनाची जडणघडण समजली की मग आपल्या लाघवी अशा, मधाळ अशा उत्तराने त्याला गोडीला आणावे म्हणजेच त्याला आपलेसे करून घ्यावे. त्याला अपल्या मतांशी अनुकूल बनवून घ्यावे.

हा अभंग आणि त्याचा भावार्थ चळवळीत कार्य करणार्या प्रत्येकाने ध्यानात ठेवला पाहिजे. त्यानुसार आचरण केले पाहिजे. नाहितर घडते काय की आपला एखाद्याशी वाद होण्याचे लक्षणे दिसली की आम्ही लगेच हमरीतुमरीवर येउन त्याला " भटाळलेला " म्हणून त्याला कायमचे आपल्या पासून आणि पर्यायाने चळवळीपासून तोडून टाकतो. तुकोबान्नी तर प्रसंगी पाया देखील पडायला सांगितलेले आहे. अर्थात हल्ली असे करणे शक्य नसले तरी समोरील व्यक्तिच्या पोटात शिरणे मात्र आपल्या सर्वान्नाच शक्य आहे. म्हणून आपण सर्वान्नीच आपल्या पायाला भिंगरी लाउन, डोक्यावर बर्फ ठेउन आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे जिभेवर साखर ठेउन समाज जागृतिचे कार्य करुया. चला तर मग सर्वान्नी मिळून " जागृतिचा अग्नी सतत तेवत ठेउ या.

डॉ.बालाजी जाधव,औरंगाबाद.
मो. 9422528290.