Monday 27 July 2015

राजमुद्रा प्रतिष्ठान पेठवडजचे ऐतिहासिक कार्य, २० ग्रामपंचायती मध्ये घेतला फडणवीस सरकारच्या निषेधाचा ठराव

फडणवीस सरकारने यंदाचा “महाष्ट्रभूषण पुरस्कार” वादग्रस्त कादंबरीकार व तथाकथित शिवशाहीर ब. मो. पुरंदरे यांना जाहीर केला. फडणवीस सरकारच्या या घाशिरामी निर्णयामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. कारण ब. मो. पुरंदरे यांनी त्यांच्या लिखाणातून, नाटकातून जागोजागी मांसाहेब जिजाऊ, राजे शहाजी, छ. शिवाजी महाराज आणि मराठा-कुणबी समाज यांची बदनामी केलेली आहे. एवढेच नाही तर जेम्स लेन प्रकरणातही पुरंदरे यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. जेम्स लेन याने राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल जे वादग्रस्त लेखन केले होते त्याला  “असे काही लेखक म्हणतात” अशी पुस्ती जोडली होती. पुरंदरे यांनी ज्या प्रकारे लेखन केलेले आहे ते वाचून लेनच्या पुस्तकातील काही लेखक हे दुसरे तिसरे कुणी नसून ब.मो. पुरंदरेच आहेत हे कोणत्याही जाणकार व्यक्तीच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. आपल्या लेखनाला कसलाही आधार नसताना पुरंदरे यांनी कपोलकल्पित लेखन केलेले आहे. शिवजयंतीचा तारीख व तिथी याचा वाद निर्माण करण्यात पुरंदरेच अग्रभागी होते. त्यांच्या या कारवायामुळे कोल्हापूर येथे त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा एक कोटीचा दावाही गुदरण्यात आलेला आहे. म्हणून राजमुद्रा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री संगम लांडगे यांनी ५ जुलै २०१५ रोजी पेठवडज येथे शिवसन्मान जागर परिषद आयोजित केली होती. या परिषदेला औरंगाबाद येथील प्रसिद्ध लेखक, वक्ते तथा प्रकाशक डॉ.बालाजी जाधव यांनी संबोधित केले होते. डॉ. जाधव यांनी या परिषदेत पुरंदरे यांच्या विकृत लिखाणाची पोलखोल केल्यामुळे राजमुद्राच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी जाऊन त्या त्या ग्रामपंचायतीचे ठराव मंजूर करून घेतले. त्यांच्या या उपक्रमाला प्रतिसाद देत आत्ता पर्यंत सुमारे २० गावातील लोकांनी ब. मो. पुरंदरे यांचा महाराष्ट्र भूषण फडणवीस सरकारने रद्द करावा असा ठराव केलेला आहे. महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात फडणवीस सरकारच्या निषेधाचे ठराव मंजूर करून घेणारे कार्य करणारे राजमुद्रा प्रतिष्ठान हे बहुधा पहिलेच असावे. त्यांच्या या कार्यामुळे समाजातल्या सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
ब.मो.पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येऊ नये म्हणून नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील खालील गावांनी निषेधाचे ठराव मंजूर केलेले आहेत.
१. आलेगाव  २. बाळंतवाडी  ३. बारूळ ४. बोरी ५. देवईची वाडी  ६. घागरदरा  ७. हनमंतवाडी ८.कल्हाळी ९. कळका १०. खंडगाव  ११. लालवाडी १२. मादाळी १३. मंगलसांगवी  १४. मंगनाळी १५. नंदनशिवणी १६. रामानाईक तांडा १७. संगुचीवाडी १८. सावरगाव (नि)  १९. सावळेश्वर. २०. पेठवडज.  

हे ऐतिहासिक कार्य करणारे राजमुद्रा प्रतिष्ठान पेठवडजचे शिलेदार पुढीलप्रमाणे :

संगम लांडगे, नीलकंठ मुगावे, गजानन जाधव, भास्कर कंधारे, खुशाल राजे, पांडुरंग कंधारे, रामदास डावकोरे, चंद्रकांत कारभारी, नामदेव कदम, प्रसाद तेलंग, सचिन इंगोले, केशव गजेवाड, भानुदास नुकुलवाड ई.                
बांधवांनो आपल्या या सच्च्या शिवमावळ्यांचे फोन करून अभिनंदन करा आणि त्यांना प्रोत्साहन द्या :
संगम लांडगे (९४२२६९३९६०) गजानन जाधव (९४२१५५१०४३) भास्कर कंधारे (९७६६८६२८७७) खुशाल राजे (९०११४४८७७७)

-डॉ.बालाजी जाधव.
मो-९४२२५२८२९०

Tuesday 21 July 2015

तुका म्हणे जरी गळे अहंकार, तरी वसे घर नारायण

वचन ते नाही तोडत शरीर Iभेदत अंतरा वज्रा ऐसे II 1 II
काही न सहावे काशाही कारणे I संधेह नीधान देह बळी II 2 II
नाही शब्द मुखी लागत तिखट I नाही जड होत पोट त्याने II 3 II
तुका म्हणे जरी गळे अहंकार  Iतरी वसे घर नारायण II 4 II

           संत तुकारामांनी अभंगाच्या माध्यमातून जीवनातील विविध अंगांना, विविध क्षेत्रांना स्पर्श केले आहे. मागच्या अभंगात आपण एखाद्याशी वाद कसा घालावा आणि त्याला गोडीला कसे आणावे हे पहिले होते. या अभंगात तुकारामांनी वाईट-साईट, विचार-पाचार न करता कसेही मनावर ओरखडे उमटवत बोलण्याने काय होते हे अत्यंत मार्मिक शब्दांत सांगितले आहे. तसे पाहायला गेले तर तुकोबांचा भर हा आयुष्यभर मानवाच्या मनाच्या शुद्धतेवरच राहिलेला आहे. मोह, माया, लोभ, मत्सर इ. तामोगुनांचा त्याग केला की ना लागे सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण अशी मानवाची अवस्था होऊन बसते आणि त्याला मग लौकिक पूजा करण्याची गरजही भासत नाही. म्हणून ते  म्हणतात- ‘करावी पूजा मनेची उत्तम, येथे लौकीकाचे काय काम?’ तेव्हा मनुष्याला वागण्या बोलण्यापासून ते कष्ट करण्यापर्यंत तुकोबांनी अभंगातून मार्गदर्शन केले आहे. आपल्या आजूबाजूला विशेषतः खेड्या मध्ये अगदी छोट्या छोट्या कारणावरून घरामध्ये किती कुरबुरी होतात हे तुकारामांनी प्रत्यक्ष पहिले होते. शेतीच्या बांधाच्या वादावरून सख्खे भाऊ एकमेकांचे मुडदे पडताना पाहून तुकोबांचे मन कासावीस झाले नसल्यास नवल. अशावेळी आपल्या विचार न करता बोलण्यामुळे कसा अनर्थ होतो हे अभंगातून सांगताना तुकोबा म्हणतात ‘वचन ते नाही शरीरा तोडत, अंतरा भेदत वज्रा ऐसे’ म्हणजे तसे पाहायला गेले तर एखाद्याने आपल्याला टोचून बोलले किंवा घालून पडून बोलले तर आपल्या शरीराला काही भोके पडत नाहीत, आपले शरीर काही तुटत नाही, भंगत नाही किंवा त्याच्यावर कसल्याही बाह्य जखमा होत नाहीत. परंतु आपले अंतर्मन जे आहे ते मात्र एखाद्या कठीणातल्या कठीण वज्राने भेदावे तसे भेदले जाते. त्याच्यावर ओरखडे उमटले जातात. त्याला तडे जातात. आपले अंतर्मन हे घायाळ होऊन जाते आणि आपण कासावीस होऊन जातो. असे मनावर वज्रासारखा आघात करणारी जी माणसे असतात हे कठीण वज्रासारखे आघात करणारे का बरे बोलत असतात? कारण त्यांच्या मनी अत्यंत अहंकार भरलेला असतो. ते काहीही झाले तरी त्यांच्या मनाविरुद्ध एकही गोष्ट सहन करू शकत नाहीत. इतरांच्या बाबतीत त्यांचा असलेला संशय, त्यांच्या मनी वसत असलेला संदेह ते मेल्याशिवाय जात नाही हे सांगताना तुकोबा म्हणतात- ‘काहीही न साहवे कशाही कारणे, संदेह निधान देह बळी.’ अशाप्रकारे केवळ मर्यादेपेक्षा जास्त अहंकार असल्यामुळे ही मंडळी आपल्या मनाविरुद्ध एकही गोष्ट सहन करून शकत नाहीत. त्यांच्या मनातला इतरांविषयी असलेला संदेह, संशय मेल्याशिवाय जात नाही एवढे हे लोक अहंकारी असतात. म्हणतात ना सुंभ जळाला तरी पिळ जात नाही म्हणून तशी या अहंकारी लोकांची अवस्था असते.
    तसे पाहायला गेले तर अशा कठोर शब्दाने, मनाला आरपार भेदून काढणाऱ्या शब्दांनी खरे तर बोलणाऱ्याचे तोंड भाजून निघत नाही, असे शब्द काही आपल्या जिभेला मिरची सारखे तिखट लागत नाहीत किंवा असे शब्द, वचन बोलल्याने आपले काही पोटही जड होत नाही. परंतु समोरच्या व्यक्तीच्या अंतर्मनाला झालेल्या जखमा कशा भरून काढायच्या? ‘नाही शब्द मुखी लागत तिखट, नाही होत जड पोट त्याने.’ शब्दांच्या होणाऱ्या परिणामांची जाणीवच नसल्यामुळे अशी व्यक्ती काहीच्या बाही बोलत असते. म्हणून तुकोबाराय म्हणतात ‘तुका म्हणे जरि गळे अहंकार, तरी वसे घर नारायण.’ म्हणजे अशा कठीण वज्रासारखे बोलायला कारणीभूत ठरणाऱ्या अहंकाराला जरी आपण आपल्यातून काढून फेकले, त्याच्या पासून आपली सुटका करून घेतली, आपल्यातील अहंकाराचे उच्चाटन केले, त्याला समूळ नष्ट केले तर आपल्याला असे शब्द उच्चारण्याची वेळच येणार नाही आणि आपल्या पोटी अहंकारच उरलेला नसल्यामुळे आपल्या मनात कुणाबद्दल कसलाच संदेह, कोणताच संशय उरणार नाही आणि पर्यायाने आपण कठीण वज्रासारखे कटू वचन, कटू शब्द वापरणे बंद करून टाकू. म्हणून ज्या घरात अहंकार गळून गेलेली माणसे वावरतात त्या घरात खऱ्या अर्थाने सुख, शांती आणि समृद्धी तर असतेच पण खऱ्या अर्थाने अशा घरातच नारायणाचा म्हणजे साक्षात पांडुरंगाचा वास असतो.
     अशाप्रकारे आपले बीजच जर का शुद्ध झाले तर मग या बीजापोटी येणारी फळे सुद्धा रसाळ आणि गोमटी असतात हे त्यांनी त्यांच्या एका वेगळ्या अभंगात स्पष्ट केलेले आहे.
शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी
मुखी अमृताची वाणी देह वेचावा कारणी
सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगाजळ
तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती


  -डॉ.बालाजी जाधव, औरंगाबाद.
(१६/०७/२०१५)



~~@@@~~

Monday 20 July 2015

शिवाजी क्लब ते टिळक रस्ता

पुरोगामी विचारधारा आणि तिचा प्रचार प्रसार करणाऱ्या प्रशिक्षित कार्यकर्त्यांना संपवणे हे इथल्या एका विशिष्ट कंपूतील लोकांचे जीवितकार्य होऊन बसलेले आहे असे इतिहासाची पणे चाळली असता आणि सध्याच्या काही घडामोडी पहिल्या की सहजपणे लक्षात येते. प्रथमतः अशा चळवळीकडे ही मंडळी दुर्लक्ष करतात, त्यांना अनुल्लेखाने मारतात. एवढे करूनही पुरोगामी विचारांचे प्राबल्य समाजात वाढतच असेल आणि त्यामुळे सनातनी विकृत विचारांचे सत्य बाहेर येत असेल तर मग अशा लोकांना ‘कुजबुज तंत्राद्वारे’ (whispering campeign) बदनाम करणे सुरु होते. अशी बदनामी करत असताना कसलेही ताळतंत्र न ठेवता अथवा तर्कबुद्धीचा वापर न करता कसलेही बेछूट आरोप करणे हे या लोकांचे तिसरे कार्य असते. उदाहरणादाखल संभाजी ब्रिगेडला ही मंडळी हे लोक तालिबानी आहेत, गुंड आहेत, ज्ञानसंस्कृतीचे विरोधक आहेत, अडाणचोट आहेत इ. इ. असे म्हणतात. अशा अफवांनीही काम होत नसेल तर मग हे लोक जातीयवादी आहेत, धर्मद्रोही आहेत, धर्मबुडवे आहेत, यांना आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांकडून पैसा मिळतो अशा प्रकारची बुद्धीशी फारकत घेऊन वक्तव्ये केली जातात. एका मनोविकृत महाभागाने तर दूरचित्रवाणी वरील जाहीर चर्चेत संभाजी ब्रिगेड या पुरोगामी संघटनेचे सिमी या बंदी घातलेल्या संघटनेशी संबंध असल्याचे सांगताना उभ्या महाराष्ट्राने पहिले व ऐकले आहे. एवढे सायास करूनही पुरोगामी विचारांचे कार्य वाढतच राहिले तर मग याच चळवळीशी या ना त्या कारणाने संबंधित असणाऱ्या तथाकथित पुरोगाम्यांना आपल्या जाळ्यात ओढले जाते आणि त्यांच्याकडून अशा चळवळी याच खऱ्या फ्यासीस्ट असून सनातनी विचारधारेची मंडळीच कशी या देशात समता प्रस्थापित करून शकतात असे लिखाण करून घेतले जाते. अर्थात अशा वेळी बहुजन समाज थोडासा विचलित होतो खरा परंतु वेळ गेली आणि वादाचा धुरळा खाली बसला की या बेगडी पुरोगाम्यांनी पांघरलेला बेगडी बुरखा टराटरा फाडला जातो आणि समाजाच्या दृष्टीस पडते तो त्यांचा सनातनी गटारघाणीत बुचकळून काढलेला सनातनी चेहरा. तेव्हा समाज परत नव्या जोमाने कामाला लागतो. बाबा पुरंदरे हे इतिहासकार नाहीत म्हणणारे एक ‘हरीचे लाल’ नाही का टी.व्ही. वर पुरंदरे हेच कसे खरे इतिहासकार आहेत असे सांगत होते ते.
     तेव्हा हे सनातनी त्या त्या चळवलींचे नेतृत्वाला विकत घेण्याचा किंवा त्याला हायज्याक प्रयत्न करतात. अर्थात असे घडणे सहज शक्य नसतेच. मग हे लोक आपल्या मूळ प्रवृत्तीवर येतात आणि पुरोगामी विचारांचे कार्य करणाऱ्या लोकांच्या मनात दहशत निर्माण करण्याच्या हेतूने ही मंडळी  घातपाती कृत्य करण्याचे डाव आखू लागतात. सनातन्यांची ही कार्यपद्धती बळीराजापासून ते काल परवाच्या गोविंद पानसरे यांच्या पर्यंत चालूच आहे. जिजाई प्रकाशनाच्या कार्यालयात शनिवारी ११ जुलै २०१५ रोजी आलेली स्फोटकेही सनातन्यांच्या याच कार्यपद्धतीचे द्योतक आहे. स्फोटकांच्या या पार्सलमध्ये अल्युमिनिअमचा एक रॉड, स्फोटकसदृश्य पदार्थ, आणि धमकीच्या मजकुराबरोबरच काही बातम्यांची कात्रणे आढळली. ही कात्रणे मा.आ.जितेंद्र आव्हाड, श्रीमंत कोकाटे आणि निखील वागळे यांच्याशी संबंधित आहेत. या तीनही कात्रणात या तिघांच्याही नावावर लाल शाईने फुल्या मारलेल्या आढळून आलेल्या आहेत. प्रस्तुत बातम्यांची कात्रणे हे क्षात्रतेज नावाच्या वृत्तपत्रातील असल्याचे दिसत आहे. स्फोटकांचे हे पार्सल टिळक रस्त्यावरील स.प. महाविद्यालया जवळील टपाल कार्यालयातून पाठवण्यात आलेले आहे. परंतु ते कुणी पाठवले याबाबत मात्र अजून कसलीही माहिती समोर आलेली नाही.   
      सनातन्यांची ही कार्यपद्धती कसकशी बदलत जाते हे पाहण्यासाठी आपण राजर्षि शाहूंचे उदाहरण घेऊ या. १८९३-९४च्या दरम्यान कोल्हापुरात भारताला इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी क्रांतीकारकांची एक गुप्त संघटना सुरु करण्यात आली. या संघटनेचे नाव ‘शिवाजी क्लब’ हे होय. या ‘शिवाजी क्लबचे’ प्रमुख उद्दिष्ट इंग्रजांची सत्ता उलथवून टाकून त्या जागी शिवछत्रपतींचे वारस असणाऱ्या शाहू छत्रपतींचे एकछत्री राज्य निर्माण करणे हे होते. त्यामुळे या क्लबला शाहू छत्रपतींची मदत असणे स्वाभाविक होते. क्लबच्या आरंभीच्या उद्दिष्टाकडे पाहून या क्लबात शाहू महाराजांचे धाकटे बंधू बापूसाहेब महाराज यांच्या पासून ते शाहू महाराजांच्या दरबारातील महत्वाचे अधिकारी जायचे. या ‘शिवाजी क्लबला’ बाळ गंगाधर टिळकांचा वरदहस्त लाभलेला होता. प्रारंभी मर्दानी खेळाचे शिक्षण देणे, गणेश उत्सव साजरा करणे, फुलेंनी सुरु केलेली शिवजयंती पुढे सुरु ठेवणे अशा प्रकारचे विविध उपक्रम या क्लबात केले जायचे. परंतु पुढे पुढे या मंडळींनी शाहूं महाराजांच्या विरोधातच कारवाया सुरु केल्या. अर्थात असे करण्यामागे राजर्षि शाहूंचे परिवर्तनवादी कार्य होते हे सांगण्याची आवशक्यता नाही. पुढे जगप्रसिद्ध असे वेदोक्त प्रकरण घडले. हे प्रकरण पेटवणारी बहुतांश मंडळी ही या ‘शिवाजी क्लबचे’ सभासद होती. म्हणून वेदोक्त प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहूंनी राजाज्ञा काढून दरबारातील मंडळींना अथवा त्यांच्या नातलगांना ‘शिवाजी क्लबशी’ कोणत्याही प्रकारचा संबंध ठेऊ नये असे सांगितले. त्यामुळे बहुतांश ब्राह्मणेत्तर-बहुजन समाजातील सभासदांनी या क्लबातून आपले अंग काढून घेतले. “परिणामी वेदोक्ताच्या पार्श्वभूमीवर शिवाजी क्लब हा मुख्यतः ब्राह्मण दहशतवाद्यांचा गट म्हणून पुढे आला.” (राजर्षी शाहू छत्रपती-जीवन व कार्य, ले. जयसिंगराव पवार)
        नारायण राजोपाध्ये या शाहू महाराजांचा नोकर असणाऱ्या ब्राह्मणाने महाराजांना क्षत्रिय मानण्यास नकार देऊन तुम्ही शूद्रच आहात असे ठणकावून सांगितले आणि म्हणून तुम्हाला जर मी पूजा अर्चा करावी वाटत असेल तर ती मी तुम्हाला शूद्र मानूनच करेन परंतू तुम्हाला मी कदापि क्षत्रिय मानणार नाही असे अत्यंत मग्रुरीने सांगितले. त्यावेळी महात्मा फुलेंनी जामीन घेऊन बाळ गंगाधर टिळकांचा जाहीर सत्कार केल्यामुळे टिळकांना समाजमान्यता मिळालेली होती. शाहू महाराजांना अपेक्षा होती की वेदोक्त प्रकरणात टिळक  आपल्याला पाठींबा देतील. परंतु राजर्षींची घोर निराशा झाली. टिळकांनी शाहूंना पाठींबा न देता तत्कालीन ब्राह्मणा वर्गाच्या पाठीशी राहणे पसंत केले. नव्हे वेदोक्त प्रकरणात टिळकांनी त्यांचा केसरी पेपर ब्राह्मणांचे मुखपत्र बनवले आणि शाहूंना स्वतःला क्षत्रिय मानण्याचे खूळ म्हणजे वेड लागले आहे अशी जहरी टीका केसरीच्या माध्यमातून सुरु केली. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे बाळ गंगाधर टिळकांसारख्या राष्ट्रीय समजल्या जाणाऱ्या  नेत्याने त्यावेळी छत्रपतींची बाजू घेतली नाही तर त्यांनी आपली सगळी ताकत छत्रपतींच्या घरातील एक नोकर असणाऱ्या आपल्या जातभाईसाठी खर्ची घातली. त्याच्यासाठी आपली सगळी संसाधने उपलब्ध करून दिली. यावरून बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेल्या सिद्धतांची सत्यता पटल्याशिवाय राहत नाही. बाबासाहेब म्हणाले होते की “पुरोगामी ब्राह्मण आणि प्रतिगामी ब्राह्मण हे एकाच शरीराच्या दोन भुजा आहेत. आणि एकाच्या अस्तित्वासाठी दुसरा लढल्याशिवाय राहणार नाही.” त्यातल्या त्यात टिळकांचे जीवनकार्य पाहता टिळक हे कोणत्याही अंगाने  पुरोगामी गटात बसत नव्हते. तेव्हा त्यांनी सनातन्यांची बाजू घेणे यात काहीही आश्चर्य नाही. जेम्स लेन प्रकरण असो, गोविंद पानसरेंची  हत्या असो की काल परवा ब्रिगेडच्या कार्यालयात पाठवेले स्फोटक प्रकरण असो अशावेळी स्वतःला पुरोगामी समजणारे, सगळेच ब्राह्मण वाईट नसतात काही चांगलेही असतात असे सांगून स्वतःला चांगले ब्राह्मण म्हणून घेणारे, गरीब, सज्जन, ज्ञासंस्कृतीचे पाईक, विचारांचा मुकाबला विचारांनी करावा असा शहजोगपणाचा सल्ला देणारे ब्राह्मण कोणत्या बिळात तोंड खुपसून बसतात हे मात्र आपल्याला समाजात नाही. अर्थात ‘मौन संमतीदर्शनम’ हे संस्कृत वचनच असल्यामुळे बाबासाहेबांचा सिद्धांत आपल्याला मनोमन पटल्याशिवाय राहत नाही.
       शिवाजी क्लबला नंतर नंतर ब्राह्मण दहशतवाद्यांचे केंद्र असे स्वरूप आले. वेदोक्ताच्या वणव्याबरोबर कोल्हापुरातील ब्राह्मण दहशतवाद्यांच्या कारवायाही वाढतच गेल्या. एवढ्या की ‘शिवाजी क्लब’ स्थापन करतानाचे त्यांचे जे उद्दिष्ट होते ते बाजूला पडले व काहीही करून राजर्षि शाहूंचा बंदोबस्त करायचा नव्हे  वेळ प्रसंगी त्यांचा काटाही काढायचा हेच त्यांचे अंतिम धेय्य होऊन बसले. म्हणून या मंडळींनी सशस्त्र क्रांती करण्यासाठीची जी शस्त्रे होती त्या शस्त्रांचा वापर खुद्द शाहू महाराजांचा घातपात करण्यासाठी सुरु केला. म्हणजे शिवरायांचेच नाव घ्यायचे आणि त्यांच्याच वारसाला संपवण्याचा प्रयत्न करायचा ही नीती सुद्धा पुरातन काळापासून वापरली जाते. तेव्हा शिवरायांच्या नावाचा कुणी जयघोष करत असेल तर डोळे बंद करून अशांच्या पाठीमागे पळणे अवसानघातकी ठरू शकते हे बहुजन समाजातील लोकांनी समजून घ्यायला हवे. वेदोक्त प्रकरणात इंग्रजांकडे दाद मागूनही सगळीकडे सपाटून मार खाल्ल्यामुळे ब्राह्मण प्रचंड संतापले होते. म्हणून इ. स. १९०६ मध्ये या मंडळींनी खोट्या नावाने मुंबई सरकारकडे अर्ज पाठवून महाराजांचे चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला. (विशेष सूचना: खोटे नाटे नाव धारण करून बहुजन समाजाच्या प्रेरणास्थानांना बदनाम करण्याचे ब्राह्मणी कारस्थान हे आजच्या काळातही चालूच आहे. फेसबुक, व्हाटस अप वर खोटे नाव धारण करून बहुजन महामानवांना बदनाम करण्याचे काम आजही किती जोमाने चालू आहे हे आपण पाहतच आहोत. तेव्हा काळ बदलला, काळानुसार शस्त्रे बदलली परंतु लढाई अजूनही तीच आहे हे बहुजनांनी समजून घ्यावे.) म्हणजे ज्यांना या देशातून इंग्रजांना हाकलून द्यायचे होते त्यांनीच इंग्रजांचे तळवे चाटून शाहूंचा बंदोबस्त करण्याचे काम सुरु केले. परंतु असल्या खोट्या नाट्या पत्रांचा इंग्रजांवर काहीही परिणाम झाला नाही. तेव्हा २१ मार्च १९०८ रोजी महाराजांची कन्या अक्कासाहेब महाराज यांच्या विवाह समारंभात बॉम्ब टाकण्याची योजना या ब्राह्मण दहशतवाद्यांनी आखली. परंतु पुण्याहून येणारा बॉम्ब कोल्हापुरात वेळेत पोहोचू शकला नाही म्हणून पुढचा अनर्थ टळला. या सगळ्या घातपाती कारवायांमागे दामू जोशी, गणपतराव मोडक या ब्राह्मण दहशवाद्यांचा हात होता.
        हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे जिजाई प्रकाशनाकडे जे स्फोटकांचे पार्सल आलेले आहे त्यावर टिळक रस्त्यावरील स.प. महाविद्यालयाजवळील टपाल कार्यालयाचा शिक्का असल्याचे वर्तमानपत्रात वाचण्यात आले. शिवाजी क्लब वर पण टिळकांचा वरदहस्त असल्याचे आपण पहिलेच आहे. तेव्हा या खोडसाळपणा मागेही टिळकांच्या वैचारिक वारसांचा हात आहे की अजून कुणाचा हे शोधण्याचे काम मात्र पोलिसांचे आहे.
(दि. १६.०७.२०१५)
डॉ.बालाजी जाधव, औरंगाबाद.

मो.९४ २२ ५२ ८२ ९०.