Sunday 30 March 2014

शिवइतिहासातील अनमोल विचार सांगणारा ग्रंथ- इंजि. स्वप्नील घुमरे


डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात-‘विचार परिवर्तन ही हर परिवर्तन का मुल है’ अर्थात विचार परिवर्तन हेच सर्व प्रकारच्या परिवर्तनाचे मूळ आहे. म्हणून सामाजिक,धार्मिक,राजकीय परिवर्तन करण्याआधी विचार परिवर्तन करावे लागतेच. संत तुकारामांनी सामाजिक व धार्मिक परिवर्तन केल्यानंतर शिवरायांनी राजकीय परिवर्तन केले. स्वराज्य निर्मितीच्या आधी विचारांची निर्मिती केली म्हणूनच हजारो मावळे जीवावर उदार होऊन मारण्यास आणि मारण्यास तयार झाली. परंतु दुर्दैवाने आज आपण शिवरायांचा हा विचारच विसरून गेलो आहोत.

हा विस्मरणात गेलेला विचार समाजापुढे आणण्यासाठी डॉ.बालाजी जाधव यांनी ‘शिवरायांचा आठवावा विचार’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी शिवरायांचे विचार किती महान होते, या विचारांचे अवलोकन करून मावळ्यांनी स्वराज्यासाठी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले, शिवरायांच्या विचारापासून प्रेरणा घेऊन भारत आणि जगातील बऱ्याच लोकांनी आधुनिक काळात कसे पराक्रम घडवले व आज आपणही शिवरायांच्या याच विचारांपासून प्रेरणा घेऊन कसे उज्वल भविष्य घडवू शकतो हे सांगण्याचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न निस्वार्थ भावनेने केलेला आहे.

नात्यापेक्षा विचार कसा मोठा असतो हे सांगत असताना डॉ.जाधवांनी हंबीरराव मोहितेंचे जे उदाहरण दिलेले आहे ते आजच्या काळात सर्वांनाच प्रेरणादायी ठरते. ‘मराठ्यांची इज्जत वाचणार नाही’ या तिसऱ्या प्रकरणात रयतेला काडीचाही आजार द्यायचा नाही असा आदेश देणाऱ्या पत्रातील अत्यंत महत्वाचा मजकूर डॉ.बालाजी जाधव यांनी सदरील पुस्तकात मांडलेला आहे. समाजातील वाईट प्रवृत्ती विरुद्ध लढत असताना नेमके तसेच वर्तन आपल्याकडूनही घडू नये याची काळजी शिवरायांना मानणाऱ्या आजच्या सर्वांनी घेतली पाहिजे असे स्पष्टपणे डॉ.बालाजी जाधव यांनी लिहिलेले आहे.

एक मराठा लाख मराठा, संभाजी राजेंच्या संस्कृत लेखनाचा अन्वयार्थ, नामर्द दैववादी, इत्यादी लेखांच्या माध्यमातून त्यांनी २१ व्या शतकाला साजेसे विचार मांडलेले आहेत. त्यातही नामर्द दैववादी या लेखातून डॉ. जाधव यांनी आजच्या तरुणांना प्रयत्नवादी व्हा असा जो सल्ला दिलेला आहे तो खूपच मौल्यवान आणि कौतुकास्पद आहे. दैववादी तरुणांना प्रयत्नवादी बनवण्यासाठी महाराष्ट्रभर फिरून व्याख्याने देणाऱ्या डॉ. जाधव यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातूनही हे महान कार्य सुरूच ठेवले आहे.

‘पर्यावरण खात्यानेच उभारावे शिवस्मारक’ या पुढील लेखात शिवरायांच्या भव्य स्मारकास विरोध करणाऱ्या पर्यावरण खात्यास अतिशय प्रखर शब्दात डॉ.बालाजी जाधव यांनी सुनावले आहे नव्हे शिवरायांचा पर्यावरण विषयक दृष्टीकोन मांडून पर्यावरण खात्यानेच शिवरायांचे स्मारक उभारणे कसे संयुक्तिक ठरते हेही दाखवून दिले आहे.

पाकिस्तानात शिवराय, अमेरिकेत शिवराय इत्यादी लेख वाचून कोणताही वाचक अचंबित झाल्याशिवाय राहणार नाही. सांबर या पदार्थाचे संभाजी या नावाशी असणारे साधर्म्य आणि त्याचा मराठ्यांनी लावलेला शोध ही तर अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान माहिती डॉ. बालाजी जाधव यांच्या पुस्तकातून मिळते. या पुस्तकातील अतिशय महत्वाचा आणि मला भावलेला लेख म्हणजे ‘तारुण्य: उद्योग करून तमासे दाखवण्याचे वय’ हा आहे. डॉ. जाधव यांनी हा लेख लिहून बुडत्या तरुणाईला रोखण्याचे आणि त्यांच्या समोर शिव आदर्शाचा एक नवीन मार्ग ठेवलेला आहे असेच म्हणावे लागते.

पुस्तकातील शेवटचा लेख म्हणजे ‘व्हिएतनामची प्रेरणा: छ. शिवराय’. आज पर्यंत मी या विषयी खूप काही ऐकून होतो. व्याख्याना मध्ये कित्येक वेळेस मी या गोष्टींचे उदाहरण देखील दिलेले आहे. परंतु याबाबत मला सविस्तर अशी माहिती कुठेही मिळाली नव्हती. जाधव सरांचे हे पुस्तक माझ्या हाती आले तेव्हा मला व्हिएतनामच्या संदर्भात पूर्ण, सखोल आणि गौरवशाली इतिहास समजला.

‘शिवरायांचा आठवावा विचार’ या पुस्तकातील डॉ. बालाजी जाधव यांनी लिहिलेले १५ ही लेख मेंदू आणि मनाला स्पर्श केल्या शिवाय राहत नाहीत. येणाऱ्या काळात देशामध्ये समता, बंधुता, न्याय व स्वतंत्रता या गोष्टींना रुजवत पुन्हा या मातीत शिवराज्याची निर्मिती करावयाची असेल तर स्वाभिमानी, स्वावलंबी आणि निस्वार्थ भावनेने कार्यरत असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यास डॉ. जाधव यांच्या या पुस्तकातून प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही.

डॉ. बालाजी जाधव यांनी इतिहास संशोधन करून शिवरायांचे अनमोल विचार समजा समोर मांडत आम्हाला शिव विचारांचे महत्व पटवून दिले त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शिवेच्छ्या.
-इंजी स्वप्नील घुमरे पाटील




पुस्तकाचे नाव: शिवरायांचा आठवावा विचार
लेखक-डॉ.बालाजी जाधव
पाने- ८८
मूल्य- ८० रु/-
प्रकाशक- पंचफुला प्रकाशन,औरंगाबाद
संपर्क-९४ २२ ५२ ८२ ९०

Wednesday 26 March 2014

शिवरायांचा आठवावा विचार: समीक्षण ते परीक्षण--नितीन सावंत


कुठलीही संघटना, चळवळ नाहीतर विचारधारा असो तिचे समीक्षण आणि परीक्षण करणे फार गरजेचे असते. त्याचप्रमाणे बाजारात आलेले नवे ग्रंथ किती महत्वपूर्ण आहेत, त्याची सत्य असत्यात काय आहे? त्यात काय खरे आणि खोटे आहे? या अंगाने त्यांचेही परीक्षण होणे गरजेचे असते. अगदी असेच एक पुस्तक १८ मार्च २०१४ रोजी ग्रंथांच्या दुनियेत आलेला आहे. तो म्हणजे डॉ.बालाजी लिखित ‘शिवरायांचा आठवावा विचार’. हा एक अत्यंत अनोखा ग्रंथ आहे. म्हणून त्या ग्रंथाचे समीक्षण आणि परीक्षण करणे अत्यंत महत्वाचे आहे.

हल्ली शिवरायांच्या त्याच कार्यावर पुन्हा पुन्हा प्रकाश टाकून ,चौर्यकर्म करून ढीगभर पुस्तके छापुन पैसे कमावणाऱ्या बऱ्याच लेखकांना उत आलेला असताना त्यात पुन्हा डॉ.बालाजी जाधवांचे हे पुस्तक म्हणजे शिळ्या कढीला उत आणण्याचा प्रयत्न वाटू शकतो. पण जसाही आपण हा ग्रंथ उघडतो आणि अनुक्रमणीकेवरून नजर फिरवतो तेव्हा त्यात शिवरायांच्या जीवनपटाची क्रमवार रचनाही दिसत नाही. किंवा अफझलखानाचा कोथळा आणि शायिस्तेखानची बोटे छाटणे हा तोच तोपणाही दिसत नाही आणि यापुस्तकात काहीतरी इतर पुस्तकांपेक्षा वेगळे आहे म्हणून वाचक पुस्तक उचलण्यास प्रवृत्त होतो.

अगदी दोन ते तीन पानांच्या लहान आशयाच्या लिखाणातून एक महान आशय मांडला जातो. अशा गहन गंभीर विचार करायला लावणाऱ्या लिखाणाला ललित लेखन असे म्हणतात. शिवइतिहासासारखा एवढा मोठा विषय ललित लिखाण्याच्या माध्यमातून मांडणे याची कल्पनाही करवत नाही. परंतु ती कल्पना डॉ.बालाजी जाधव यांनी प्रत्यक्षात उतरवली आहे. आणि चक्क शिवचरीत्रातल्या दुर्लक्षित अनेक पैलूंवर ललित लेखनही केले आहे. महाराष्ट्रात शिवरायांवर ललित लिखाण करणारे माझ्या नजरेतले ते पहिलेच लेखक आहेत. याबद्दल त्यांची दाखल घेतली पाहिजे आणि त्यांचा विशेष सन्मानही झाला पाहिजे. कारण ललित लेखन हे काम अत्यंत अवघड आणि कमीत कमी शब्दात मोठा आशय मांडणारे असते.

शिवरायांच्या जीवनातील महत्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या एखाद्या घटनेने लिखाणाची सुरुवात होते आणि आज त्याची प्रासंगिकता काय किंवा उपयुक्तता काय या समन्वयाने लेख संपतो. हे अत्यंत कौतुकास्पद लिखाणवर्तन डॉ.बालाजी जाधव यांचे दिसून येते.

बोलतानाही जपून बोलावे नाहीतर शब्दांचे अर्थ बदलतात या न्यायाने लेखक ‘गनिमी कावा’ अर्थात शत्रूचा डावपेच हा शब्द नाकारून ‘शिवतन्त्र’ आणि ‘शिवनीति’ हे नवे शब्द सुचवतात. हे शब्द किती संयुक्तिक आहेत हे फार सुंदररित्या डॉ.जाधव त्यांच्या ‘सुरतेची स्वारी’ या लेखात पटवून देतात.

‘नामर्द दैववादी’ या लेखात प्रयत्नवाद अत्यंत सुंदररित्या पटवून  देताना डॉ. जाधव छ. संभाजीराजेंच्या जीवनातील आणि शिवचरित्रातील काही महत्वाच्या आणि उपेक्षित घटनांकडे वाचकाचे लक्ष वेधून घेतात.

त्यांच्या लिखाणाची प्रासंगिकता काय म्हणाल? तर ‘पर्यावरण खात्यानेच उभारावे शिवस्मारक’ हा दर्जेदार लेख वाचकांसोबत शिवस्मारकाला परवानगी नाकारणाऱ्या पर्यावरण खात्याच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालतो. या लेखात लेखक म्हणतात,” समुद्रात गणेशमूर्ती बुडविल्याने पर्यावरण धोक्यात येत नाही का?”

‘पाकिस्तानात शिवराय’ हा अत्यंत अद्भुत आणि आश्चर्यकारक लेख या संपूर्ण ग्रंथाचा आकर्षण राहिलेला आहे. प्रस्तुत लेख वाचताना वाचक तोंडात बोट घातल्याशिवाय राहत नाही.

शिवराय संपूर्ण जगाची प्रेरणा ठरत आहेत. जगभर शिवरायांवर अभ्यास संशोधन चालू आहेत. शिवरायांच्या युद्धतंत्राने तर जगाला मोहित केलेले आहे. मग ते ब्रिटीश असोत अमेरिकन असोत किंवा व्हिएतनाम सारखे छोटेसे राष्ट्र असो. भारताच्या बाहेर गेलेले शिवराय हे सप्रमाण पुरावे देऊन लिहिताना डॉ. जाधव मराठी वाचकांची कानउघाडणी करतात. शिवरायांचे अमेरिकेत अश्वारूढ स्मारक बसताना त्याला कुणी कुणी आडकाठी घातली हे ते ‘अमेरिकेत शिवराय’ या लेखात स्पष्ट करतात.

या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे शाब्दिक कोट्या, लिखाणातली निर्भीडता आणि स्पष्टवक्तेपणा होय. दांभिक लेखकांच्या दांभिकतेवर वार करताना ते ‘हरीचे लाल’ अशा प्रकारचे शब्द वापरून चळवळीतील भीषण वास्तव लक्षात आणून देतात. अगदी असेच निर्भीड लेखन ते शेवटचे प्रकरण असणाऱ्या ‘व्हिएतनामची प्रेरणा: छ. शिवराय’ या लेखात करतात. प्रस्तुत लेखात ते शिवरायांचा दैदिप्यमान इतिहास तर सांगतातच पण शिवरायांच्या नावावर आपल्या झोळ्या भरणाऱ्या वक्त्यांच्या गैरवर्तनावर बोट ठेवताना लिहितात,” ज्यांना उपम्यात साखर नसते याची अक्कल नाही ते शिवचरित्रावर काय भाष्य करणार?”

ललित लिखाणाच्या माध्यमातून सर्वांगाने शिवस्पर्श करणारे डॉ.बालाजी जाधव एकदा सर्वांनी समजून घेतलेच पाहिजेत.

लहानांपासून थोरांपर्यांत हे पुस्तक सर्वांना वाचनीय असेच लिहिले गेले आहे. विशेषतः तरुणांसाठी ‘तारुण्य: उद्योग करून तमासे दाखवण्याचे वय’ या लेखात व्यंकोजींची उदासीनता दूर करण्यासाठी शिवरायांनी लिहिलेल्या प्रेरणादायी पत्र प्रसंगाचे वर्णन वाचकांनी नक्कीच वाचावे.

अशाप्रकारे एकूण १५ प्रकरणांचे हे शिव चरित्रात्मक पुस्तक पंचफुला प्रकाशन संस्थेने वाचकांसाठी पुढे आणले आणि नाममात्र दरात सर्वसामान्यांसाठी हे कौतुकास्पद म्हटले पाहिजे.

प्रास्ताविकात लेखक म्हणतात, “आम्हाला शिवरायांचा प्रताप आठवायला सांगितला,त्यांचे रूप आठवायला सांगितले,त्यांचा साक्षेपही आठवायला सांगितला परंतु आजपर्यंत कुणीच आम्हाला शिवरायांनी दिलेला विचार कधीच आठवायला सांगितलेला नाही.” हे अगदी सत्य आहे आणि म्हणूनच ‘शिवरायांचा आठवावा विचार’ हा ग्रंथ लिहून आपल्याला एक नवीन दृष्टीकोन देतात. सर्वात क्षेत्रात मराठे अग्रेसर होते. त्यांनी आज पुन्हा नव्या जोमाने झेप घ्यावी. जगभर प्रगतीसाठी हिंडावे आणि पराक्रमाचे तमासे दाखवावेत हाच या पुस्तकाचा गर्भितार्थ आहे.

संस्कृतीच्या गप्पा मारणाऱ्यांनी लक्षात घ्यावे की संस्कृतीचे निर्माते, रक्षणकर्ते हे मराठेच होते. भारतनाट्यम या नृत्य प्रकारचे जनकच छ.संभाजी महाराज आहेत. अनेक खाद्य पदार्थांची निर्मिती मराठ्यांनी केली. प्रस्तुत ग्रंथात ‘संभाजी सारम, साम्भाराम आणि सांबर’ हे प्रकरण मला फार आवडले. कारण एक प्रगतीशील संस्कृती जन्माला घालणारे शिवरायांचे वारसदार आज कुठे आहेत अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे आणि याचे भीषण चित्रण लेखकाने या प्रकरणात केलेलं आहे.

म्हणून शिवप्रेमींनी आणि वास्तव वादी वाचकांनी हा ग्रंथ जरूर वाचावाच. मोटीव्हेशनल ट्रेनर साठीही हे पुस्तक तेवढेच महत्वाचे आहे जेवढे इतिहासकारांसाठी. चला तर मग आता सर्वांनीच शिवरायांचा विचार आठवूया.
-नितीन सावंत
विभागीय अध्यक्ष
जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद

(पुस्तकासाठी संपर्क- पंचफुला प्रकाशन, औरंगाबाद. मो-९४ २२ ५२ ८२ ९० ) 

‘शिवरायांचा आठवावा विचार’ पुस्तकाबद्दल हितगुज--महेश मुठाळ


आदरणीय डॉ.साहेब,
आपली या पूर्वी मी सर्वच पुस्तके वाचली. पण आपण लिहिलेले ‘शिवरायांचा आठवावा विचार’ हे जे पुस्तक आहे ते वाचून मला माझे अश्रू अनावर झाले.

आपले ६ वे पुस्तक उत्तम आणि संशोधनपर साहित्य आहे असेच मी म्हणेन. या पुस्तकात आपण जी अपेक्षा व्यक्त केली की या पुस्तकातून शिवचरित्राकडे पाहण्याची नजर, दृष्टीकोन वाचकांना मिळावा ती  अपेक्षा नक्कीच पूर्ण होते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. पुस्तकाविषयी बोलायचे झाले तर आजपर्यंत सिंगल पिऊन दंगल करण्यापुरते शिवराय आमच्या समाजातील मुलांना सांगितले गेले पण खऱ्या अर्थाने खरे शिवराय त्यांच्या पर्यंत पोहचलेच नाहीत. आमचा वसा आणि वारसा काय? शिवरायांसोबतच इतरही राजे अत्यंत उच्च कोटीचे काम करून गेले हे देखील आपल्या ग्रंथातून आपण आमच्यासमोर ठेवण्याचे खूप मोठे काम केले आहे. सरफोजीराजे भोसले यांनी भारतातील पहिली डोळ्यांची शस्त्रक्रिया केली हे मलाच नव्हे तर एका दिवसात तीन तीन व्याख्याने देत फिरणाऱ्या वक्त्यांनाही माहित नाहीये तर डी.जे. च्या तालावर नाचणाऱ्याना कुठून माहित होणार?

या ग्रंथातील तारुण्याची व्याख्या ही अतिशय बोलकी आणि मनामध्ये उमेद निर्माण करणारी आहे. म्हणजे छ.शिवरायांनी अफजल खानाचा कोथळा काढला एवढेच आजपर्यंत रंगवून रंगवून सांगितले गेले. त्यांच्या लढाया सांगून बढाया मारल्या गेल्या. पण शिवरायांनी आपल्या सावत्र भाऊ व्यंकोजीराजे यांना दिलेला मौलिक विचार आम्हाला आपल्या ग्रंथातून शिकायला मिळाला.

शेकडो वक्ते व्याख्यानातून ‘जे दैववादी असतात ते नामर्द असतात आणि जे प्रयत्नवादी असतात तेच खरे मर्द असतात’ हे संभाजी राजेंचे वाक्य मोठ मोठ्याने सांगतात परंतु दैववाद आणि प्रयत्नवादाविषयीचे ‘शिवरायांचा आठवावा विचार’ या पुस्तकातील विश्लेषण अतिशय बोलके आणि प्रत्येकाने जोपासण्यासारखे आहे.

आपल्याकडे अजूनही शिवरायांच्या जन्म तारखेचाच वाद चालू आहे पण शिवराय हे १७ व्या शतकातील अंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनापती होते हे आपल्या पाकिस्तानात शिवराय, अमेरिकेतही शिवराय आणि व्हिएतनामची प्रेरणा: छ. शिवराय या लेखातून समजते. प्रस्तुत लेख वाचताना प्रत्येक शिवभक्ताच्या अंगावर काटा आणि डोळ्यात आनंदआश्रू आल्याशिवाय राहत नाही. म्हणून मी एवढेच म्हणेन की आपण लिहिलेला ग्रंथ अतिशय छोटा आहे पण हजारो पानांच्या ग्रंथातून जे मिळत नाही ते सार आपल्या ग्रंथातून वाचकांस मिळतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे.

डॉ. साहेब आपल्या एकूणच लेखन साहित्याबद्दल बोलायचे झाले तर लोकांना खिळवून ठेवण्यासाठी बरे बोलणारे आणि बरे लिहिणारे बरेच असतात पण खरं इतिहास सांगून लोकांचे डोळे उघडे करायला लावणारे फार कमी लोक असतात. संताची परंपरा सांगणारे सांगणारे तुकोबाराय, नामदेवराय, तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज, फुले, शाहू, आंबेडकर, डॉ.आ.ह.साळुंखे, मा.म.देशमुख, युगानायक खेडेकर साहेब, इ. लोकांनी बरे वाटावे म्हणून व्याख्याने, कीर्तने किंवा लेखन केले नाही तर लोक बरे व्हावेत शोषण व्यवस्थेतून मुक्त व्हावेत म्हणून सगळा प्रपंच केला. आपण त्यांच्या बरोबरीचे आहात असा दावा मी करत नाही परंतु ‘मराठ्यांनो षंढ झालात काय?’ हे पुस्तक लिहून लोकांच्या मस्तकात विचारांच्या लहरी आपण निर्माण करू शकलात. लोकांना तुम्ही बरे नाही तर खरे बोलण्याची हिम्मत आणि जिगरबाजपणा दिलात जो आपल्या विचारात आणि स्वभावातही आहे. तो लिखाणातून दाखवला म्हणून या सर्व परिवर्तनवादी महानायकांचे वैचारिक वारस  आपण नक्कीच आहात असं मला वाटते.

या सर्व महानायकांच्या वाट्याला जे आले तेवढे नसले तरी बऱ्याच गोष्टी आपल्या सोबत घडल्या याचा मी साक्षीदार आहे. खरे बोलणाऱ्या तुकोबारायांमुळे लोकांच्या दुकानदाऱ्या बंद पडतील म्हणून त्यांची गाथा इंद्रायणीत बुडविली. जगाला नैतिकता सांगणाऱ्या नामदेवांना पांडुरंगाच्या मंदिरातून बाहेर काढले गेले असे कितीतरी उदाहरणे आपल्याला देता येतील. तुमच्याही पुस्तकांना विरोध झाला, धमक्या दिल्या गेल्या, व्याख्याने बंद पडली, पाडली पण तरीही या सर्वांच्या नाकावर टिच्चून आपण एवढे चांगले विचार “शिवरायांच्या आठवावा विचार” या ग्रंथ रूपाने आम्हासारख्या नवीन वक्त्यांना आणि कार्यकर्त्यांना दिले आहेत ते नक्कीच आमच्या वाटचालीत मोलाचा दगड ठरतील याची मला खात्री आहे. अनेक लोक हे छंद, व्यवसाय, आवड म्हणून या गोष्टींकडे पाहतात पण आपण हे सगळ तळमळीने उभे केले आहे आणि आपला हा प्रयत्न पूर्णपणे यशस्वी झाला असे मला वाटते. कारण अतिशय लहान वयात, कमी वेळेत कुठलेही मार्केटिंग न करता महाराष्ट्रात चळवळीतील कार्यकर्त्यांच्या घराघरात आपण आपल्या साहित्य रूपाने गेलेले आहात.

काही गोष्टी कमी जास्त होतात त्या सर्व आपल्याला येणाऱ्या काळात मिळतील आणि मिळाव्यात अशी मां जिजाऊ चरणी प्रार्थना करतो.

एवढे लिहून देखील तुमच्या स्वभावाचा उल्लेख केल्याशिवाय हे लेखन पूर्ण होऊच शकत नाही. मी औरंगाबादला आल्यापासून २००९ पासून आपण माझे मित्र आहात. या ५ - ६ वर्षाच्या वाटचालीत तुम्ही कधी रागावलात, चिडलात याचा मला कधीच राग आला नाही. उलट मी आत्मपरीक्षण केले. आपण खूप संवेदनशील प्रेमळ, तेवढेच कठोर आणि कर्तव्यदक्ष आहात. आपले एवढे वाचन, अभ्यास, लिखाण असून देखील तुम्ही मला कधीच अंतर दिले. नाही उलट वेळोवेळी मार्गदर्शन केले. या बद्दल मी आभार मानून ऋणातून मुक्त होणार नाही तर आपल्या ऋणात राहू इच्छितो.

आपण आपल्या सोबत घडणारी प्रत्येक गोष्ट माझ्याशी व्यक्त केली आणि आपल्या अनुभवातून मला शहाणे केले. म्हणून तुमचे आजपर्यंत लिखाण, मैत्री आणि मार्दर्शन मी कधीच विसरू शकणार नाही. या मिळालेल्या शिदोरीच्या बळावर आयुष्य सुंदरतेने जगू व इतरांनाही जगायला शिकवू एवढे लिहून थांबतो. मी लेखक नाही पण आपण मला लिहित केलं त्याबद्दल आभार मानने मी माझे कर्तव्य समजतो. आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छ्या.

जय जिजाऊ !!!
       
(वरील पत्र महेश मुठाळ यांनी दि. २५ मार्च २०१४ रोजी पाठवले आहे.)

पुस्तकाचे नाव: शिवरायांचा आठवावा विचार 
लेखक-डॉ.बालाजी जाधव
पाने- ८८ 
मूल्य- ८० रु/-
प्रकाशक- पंचफुला प्रकाशन,औरंगाबाद 
संपर्क-९४ २२ ५२ ८२ ९० 

Thursday 13 March 2014

शिवरायांचा आठवावा विचार


शिवरायांचा आठवावा विचार 
प्रस्तुत पुस्तकाचे प्रकाशन १८ मार्च २०१४ रोजी राजे शहाजी यांच्या जयंती निमित्त पितृतीर्थ वेरूळ येथे मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या पुस्तकात डॉ. बालाजी जाधव यांचे अत्यंत गाजलेले आणि दुर्मिळ असे लेख आहेत. या ग्रंथातील शिवचरित्राविषयी आलेली माहिती पूर्वी कोणत्याच पुस्तकात आलेली नाही आणि आली तरी अत्यंत त्रोटक आलेली आहे. त्यामुळे ज्यांना शिवचरित्रावर लेखन अथवा व्याख्यान करावयाचे आहे त्यांना हे पुस्तक संदर्भ ग्रंथ म्हणून अत्यंत उपयोगाचे आहे. म्हणून प्रस्तुत पुस्तक महाराष्ट्रातील घराघरात जाणे अत्यंत गरजेचे आहे. या पुस्तकातील विषयाचा परिचय लेखांच्या नावावरूनच होईल.
या पुस्तकात खालील लेख समाविष्ट आहेत.
१. नात्यापेक्षा विचार मोठा.
२. सुरतेची स्वारी.
३. तर मराठ्यांची इज्जत वाचणार नाही.
४. एक मराठा, लाख मराठा.
५. नामर्द दैववादी.
६. संभाजी राजांच्या संस्कृत लिखाणाचा अन्वयार्थ.
७. पर्यावरण खात्यानेच उभारावे शिवस्मारक.
८. पाकिस्तानात शिवाजीमहाराज .
९. अमेरिकेतही शिवराय.
१०. संभाजी सारम, साम्भारम आणि सांबर.
११.छ.शिवराय, फुलेंचे पणजोबा आणि मनुस्मृती.
१२.तारुण्य: उद्योग करून तमासे दाखवण्याचे वय.
१३. मराठ्यांचा वैद्यकीय वारसा.
१४. शिवजयंतीचे प्रवर्तक:म.फुले ते पुरुषोत्तम खेडेकर.
१५. व्हिएतनामची प्रेरणा: छ.शिवराय

एकूण पृष्ठ-८८
किंमत-८० रु/-
प्रकाशक-पंचफुला प्रकाशन,औरंगाबाद.
संपर्क-९४ २२ ५२ ८२ ९०