आदरणीय डॉ.साहेब,
आपली या पूर्वी मी सर्वच पुस्तके वाचली. पण आपण लिहिलेले ‘शिवरायांचा आठवावा विचार’ हे जे पुस्तक आहे ते वाचून मला माझे अश्रू अनावर झाले.
आपले ६ वे पुस्तक उत्तम आणि संशोधनपर साहित्य आहे असेच मी म्हणेन. या पुस्तकात आपण जी अपेक्षा व्यक्त केली की ‘या पुस्तकातून शिवचरित्राकडे पाहण्याची नजर, दृष्टीकोन वाचकांना मिळावा’ ती अपेक्षा नक्कीच पूर्ण होते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. पुस्तकाविषयी बोलायचे झाले तर आजपर्यंत सिंगल पिऊन दंगल करण्यापुरते शिवराय आमच्या समाजातील मुलांना सांगितले गेले पण खऱ्या अर्थाने खरे शिवराय त्यांच्या पर्यंत पोहचलेच नाहीत. आमचा वसा आणि वारसा काय? शिवरायांसोबतच इतरही राजे अत्यंत उच्च कोटीचे काम करून गेले हे देखील आपल्या ग्रंथातून आपण आमच्यासमोर ठेवण्याचे खूप मोठे काम केले आहे. सरफोजीराजे भोसले यांनी भारतातील पहिली डोळ्यांची शस्त्रक्रिया केली हे मलाच नव्हे तर एका दिवसात तीन तीन व्याख्याने देत फिरणाऱ्या वक्त्यांनाही माहित नाहीये तर डी.जे. च्या तालावर नाचणाऱ्याना कुठून माहित होणार?
या ग्रंथातील तारुण्याची व्याख्या ही अतिशय बोलकी आणि मनामध्ये उमेद निर्माण करणारी आहे. म्हणजे छ.शिवरायांनी अफजल खानाचा कोथळा काढला एवढेच आजपर्यंत रंगवून रंगवून सांगितले गेले. त्यांच्या लढाया सांगून बढाया मारल्या गेल्या. पण शिवरायांनी आपल्या सावत्र भाऊ व्यंकोजीराजे यांना दिलेला मौलिक विचार आम्हाला आपल्या ग्रंथातून शिकायला मिळाला.
शेकडो वक्ते व्याख्यानातून ‘जे दैववादी असतात ते नामर्द असतात आणि जे प्रयत्नवादी असतात तेच खरे मर्द असतात’ हे संभाजी राजेंचे वाक्य मोठ मोठ्याने सांगतात परंतु दैववाद आणि प्रयत्नवादाविषयीचे ‘शिवरायांचा आठवावा विचार’ या पुस्तकातील विश्लेषण अतिशय बोलके आणि प्रत्येकाने जोपासण्यासारखे आहे.
आपल्याकडे अजूनही शिवरायांच्या जन्म तारखेचाच वाद चालू आहे पण शिवराय हे १७ व्या शतकातील अंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनापती होते हे आपल्या पाकिस्तानात शिवराय, अमेरिकेतही शिवराय आणि व्हिएतनामची प्रेरणा: छ. शिवराय या लेखातून समजते. प्रस्तुत लेख वाचताना प्रत्येक शिवभक्ताच्या अंगावर काटा आणि डोळ्यात आनंदआश्रू आल्याशिवाय राहत नाही. म्हणून मी एवढेच म्हणेन की आपण लिहिलेला ग्रंथ अतिशय छोटा आहे पण हजारो पानांच्या ग्रंथातून जे मिळत नाही ते सार आपल्या ग्रंथातून वाचकांस मिळतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे.
डॉ. साहेब आपल्या एकूणच लेखन साहित्याबद्दल बोलायचे झाले तर लोकांना खिळवून ठेवण्यासाठी बरे बोलणारे आणि बरे लिहिणारे बरेच असतात पण खरं इतिहास सांगून लोकांचे डोळे उघडे करायला लावणारे फार कमी लोक असतात. संताची परंपरा सांगणारे सांगणारे तुकोबाराय, नामदेवराय, तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज, फुले, शाहू, आंबेडकर, डॉ.आ.ह.साळुंखे, मा.म.देशमुख, युगानायक खेडेकर साहेब, इ. लोकांनी बरे वाटावे म्हणून व्याख्याने, कीर्तने किंवा लेखन केले नाही तर लोक बरे व्हावेत शोषण व्यवस्थेतून मुक्त व्हावेत म्हणून सगळा प्रपंच केला. आपण त्यांच्या बरोबरीचे आहात असा दावा मी करत नाही परंतु ‘मराठ्यांनो षंढ झालात काय?’ हे पुस्तक लिहून लोकांच्या मस्तकात विचारांच्या लहरी आपण निर्माण करू शकलात. लोकांना तुम्ही बरे नाही तर खरे बोलण्याची हिम्मत आणि जिगरबाजपणा दिलात जो आपल्या विचारात आणि स्वभावातही आहे. तो लिखाणातून दाखवला म्हणून या सर्व परिवर्तनवादी महानायकांचे वैचारिक वारस आपण नक्कीच आहात असं मला वाटते.
या सर्व महानायकांच्या वाट्याला जे आले तेवढे नसले तरी बऱ्याच गोष्टी आपल्या सोबत घडल्या याचा मी साक्षीदार आहे. खरे बोलणाऱ्या तुकोबारायांमुळे लोकांच्या दुकानदाऱ्या बंद पडतील म्हणून त्यांची गाथा इंद्रायणीत बुडविली. जगाला नैतिकता सांगणाऱ्या नामदेवांना पांडुरंगाच्या मंदिरातून बाहेर काढले गेले असे कितीतरी उदाहरणे आपल्याला देता येतील. तुमच्याही पुस्तकांना विरोध झाला, धमक्या दिल्या गेल्या, व्याख्याने बंद पडली, पाडली पण तरीही या सर्वांच्या नाकावर टिच्चून आपण एवढे चांगले विचार “शिवरायांच्या आठवावा विचार” या ग्रंथ रूपाने आम्हासारख्या नवीन वक्त्यांना आणि कार्यकर्त्यांना दिले आहेत ते नक्कीच आमच्या वाटचालीत मोलाचा दगड ठरतील याची मला खात्री आहे. अनेक लोक हे छंद, व्यवसाय, आवड म्हणून या गोष्टींकडे पाहतात पण आपण हे सगळ तळमळीने उभे केले आहे आणि आपला हा प्रयत्न पूर्णपणे यशस्वी झाला असे मला वाटते. कारण अतिशय लहान वयात, कमी वेळेत कुठलेही मार्केटिंग न करता महाराष्ट्रात चळवळीतील कार्यकर्त्यांच्या घराघरात आपण आपल्या साहित्य रूपाने गेलेले आहात.
काही गोष्टी कमी जास्त होतात त्या सर्व आपल्याला येणाऱ्या काळात मिळतील आणि मिळाव्यात अशी मां जिजाऊ चरणी प्रार्थना करतो.
एवढे लिहून देखील तुमच्या स्वभावाचा उल्लेख केल्याशिवाय हे लेखन पूर्ण होऊच शकत नाही. मी औरंगाबादला आल्यापासून २००९ पासून आपण माझे मित्र आहात. या ५ - ६ वर्षाच्या वाटचालीत तुम्ही कधी रागावलात, चिडलात याचा मला कधीच राग आला नाही. उलट मी आत्मपरीक्षण केले. आपण खूप संवेदनशील प्रेमळ, तेवढेच कठोर आणि कर्तव्यदक्ष आहात. आपले एवढे वाचन, अभ्यास, लिखाण असून देखील तुम्ही मला कधीच अंतर दिले. नाही उलट वेळोवेळी मार्गदर्शन केले. या बद्दल मी आभार मानून ऋणातून मुक्त होणार नाही तर आपल्या ऋणात राहू इच्छितो.
आपण आपल्या सोबत घडणारी प्रत्येक गोष्ट माझ्याशी व्यक्त केली आणि आपल्या अनुभवातून मला शहाणे केले. म्हणून तुमचे आजपर्यंत लिखाण, मैत्री आणि मार्दर्शन मी कधीच विसरू शकणार नाही. या मिळालेल्या शिदोरीच्या बळावर आयुष्य सुंदरतेने जगू व इतरांनाही जगायला शिकवू एवढे लिहून थांबतो. मी लेखक नाही पण आपण मला लिहित केलं त्याबद्दल आभार मानने मी माझे कर्तव्य समजतो. आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छ्या.
जय जिजाऊ !!!
(वरील पत्र महेश मुठाळ यांनी दि. २५ मार्च २०१४ रोजी पाठवले आहे.)
पुस्तकाचे नाव: शिवरायांचा आठवावा विचार
लेखक-डॉ.बालाजी जाधव
पाने- ८८
मूल्य- ८० रु/-
प्रकाशक- पंचफुला प्रकाशन,औरंगाबाद
संपर्क-९४ २२ ५२ ८२ ९०

No comments:
Post a Comment