कुठलीही संघटना, चळवळ
नाहीतर विचारधारा असो तिचे समीक्षण आणि परीक्षण करणे फार गरजेचे असते.
त्याचप्रमाणे बाजारात आलेले नवे ग्रंथ किती महत्वपूर्ण आहेत, त्याची सत्य असत्यात
काय आहे? त्यात काय खरे आणि खोटे आहे? या अंगाने त्यांचेही परीक्षण होणे गरजेचे
असते. अगदी असेच एक पुस्तक १८ मार्च २०१४ रोजी ग्रंथांच्या दुनियेत आलेला आहे. तो
म्हणजे डॉ.बालाजी लिखित ‘शिवरायांचा आठवावा विचार’. हा एक अत्यंत अनोखा ग्रंथ आहे.
म्हणून त्या ग्रंथाचे समीक्षण आणि परीक्षण करणे अत्यंत महत्वाचे आहे.
हल्ली शिवरायांच्या त्याच
कार्यावर पुन्हा पुन्हा प्रकाश टाकून ,चौर्यकर्म करून ढीगभर पुस्तके छापुन पैसे
कमावणाऱ्या बऱ्याच लेखकांना उत आलेला असताना त्यात पुन्हा डॉ.बालाजी जाधवांचे हे
पुस्तक म्हणजे शिळ्या कढीला उत आणण्याचा प्रयत्न वाटू शकतो. पण जसाही आपण हा ग्रंथ
उघडतो आणि अनुक्रमणीकेवरून नजर फिरवतो तेव्हा त्यात शिवरायांच्या जीवनपटाची
क्रमवार रचनाही दिसत नाही. किंवा अफझलखानाचा कोथळा आणि शायिस्तेखानची बोटे छाटणे
हा तोच तोपणाही दिसत नाही आणि यापुस्तकात काहीतरी इतर पुस्तकांपेक्षा वेगळे आहे
म्हणून वाचक पुस्तक उचलण्यास प्रवृत्त होतो.
अगदी दोन ते तीन पानांच्या
लहान आशयाच्या लिखाणातून एक महान आशय मांडला जातो. अशा गहन गंभीर विचार करायला
लावणाऱ्या लिखाणाला ललित लेखन असे म्हणतात. शिवइतिहासासारखा एवढा मोठा विषय ललित
लिखाण्याच्या माध्यमातून मांडणे याची कल्पनाही करवत नाही. परंतु ती कल्पना
डॉ.बालाजी जाधव यांनी प्रत्यक्षात उतरवली आहे. आणि चक्क शिवचरीत्रातल्या
दुर्लक्षित अनेक पैलूंवर ललित लेखनही केले आहे. महाराष्ट्रात शिवरायांवर ललित
लिखाण करणारे माझ्या नजरेतले ते पहिलेच लेखक आहेत. याबद्दल त्यांची दाखल घेतली पाहिजे
आणि त्यांचा विशेष सन्मानही झाला पाहिजे. कारण ललित लेखन हे काम अत्यंत अवघड आणि
कमीत कमी शब्दात मोठा आशय मांडणारे असते.
शिवरायांच्या जीवनातील
महत्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या एखाद्या घटनेने लिखाणाची सुरुवात होते आणि आज
त्याची प्रासंगिकता काय किंवा उपयुक्तता काय या समन्वयाने लेख संपतो. हे अत्यंत
कौतुकास्पद लिखाणवर्तन डॉ.बालाजी जाधव यांचे दिसून येते.
बोलतानाही जपून बोलावे
नाहीतर शब्दांचे अर्थ बदलतात या न्यायाने लेखक ‘गनिमी कावा’ अर्थात शत्रूचा डावपेच
हा शब्द नाकारून ‘शिवतन्त्र’ आणि ‘शिवनीति’ हे नवे शब्द सुचवतात. हे शब्द किती
संयुक्तिक आहेत हे फार सुंदररित्या डॉ.जाधव त्यांच्या ‘सुरतेची स्वारी’ या लेखात
पटवून देतात.
‘नामर्द दैववादी’ या लेखात प्रयत्नवाद
अत्यंत सुंदररित्या पटवून देताना डॉ. जाधव
छ. संभाजीराजेंच्या जीवनातील आणि शिवचरित्रातील काही महत्वाच्या आणि उपेक्षित
घटनांकडे वाचकाचे लक्ष वेधून घेतात.
त्यांच्या लिखाणाची
प्रासंगिकता काय म्हणाल? तर ‘पर्यावरण खात्यानेच उभारावे शिवस्मारक’ हा दर्जेदार
लेख वाचकांसोबत शिवस्मारकाला परवानगी नाकारणाऱ्या पर्यावरण खात्याच्या डोळ्यात
झणझणीत अंजन घालतो. या लेखात लेखक म्हणतात,” समुद्रात गणेशमूर्ती बुडविल्याने
पर्यावरण धोक्यात येत नाही का?”
‘पाकिस्तानात शिवराय’ हा
अत्यंत अद्भुत आणि आश्चर्यकारक लेख या संपूर्ण ग्रंथाचा आकर्षण राहिलेला आहे.
प्रस्तुत लेख वाचताना वाचक तोंडात बोट घातल्याशिवाय राहत नाही.
शिवराय संपूर्ण जगाची
प्रेरणा ठरत आहेत. जगभर शिवरायांवर अभ्यास संशोधन चालू आहेत. शिवरायांच्या युद्धतंत्राने
तर जगाला मोहित केलेले आहे. मग ते ब्रिटीश असोत अमेरिकन असोत किंवा व्हिएतनाम
सारखे छोटेसे राष्ट्र असो. भारताच्या बाहेर गेलेले शिवराय हे सप्रमाण पुरावे देऊन लिहिताना
डॉ. जाधव मराठी वाचकांची कानउघाडणी करतात. शिवरायांचे अमेरिकेत अश्वारूढ स्मारक
बसताना त्याला कुणी कुणी आडकाठी घातली हे ते ‘अमेरिकेत शिवराय’ या लेखात स्पष्ट
करतात.
या पुस्तकाचे वैशिष्ट्य
म्हणजे शाब्दिक कोट्या, लिखाणातली निर्भीडता आणि स्पष्टवक्तेपणा होय. दांभिक लेखकांच्या
दांभिकतेवर वार करताना ते ‘हरीचे लाल’ अशा प्रकारचे शब्द वापरून चळवळीतील भीषण
वास्तव लक्षात आणून देतात. अगदी असेच निर्भीड लेखन ते शेवटचे प्रकरण असणाऱ्या
‘व्हिएतनामची प्रेरणा: छ. शिवराय’ या लेखात करतात. प्रस्तुत लेखात ते शिवरायांचा
दैदिप्यमान इतिहास तर सांगतातच पण शिवरायांच्या नावावर आपल्या झोळ्या भरणाऱ्या
वक्त्यांच्या गैरवर्तनावर बोट ठेवताना लिहितात,” ज्यांना उपम्यात साखर नसते
याची अक्कल नाही ते शिवचरित्रावर काय भाष्य करणार?”
ललित लिखाणाच्या माध्यमातून
सर्वांगाने शिवस्पर्श करणारे डॉ.बालाजी जाधव एकदा सर्वांनी समजून घेतलेच पाहिजेत.
लहानांपासून थोरांपर्यांत
हे पुस्तक सर्वांना वाचनीय असेच लिहिले गेले आहे. विशेषतः तरुणांसाठी ‘तारुण्य:
उद्योग करून तमासे दाखवण्याचे वय’ या लेखात व्यंकोजींची उदासीनता दूर करण्यासाठी
शिवरायांनी लिहिलेल्या प्रेरणादायी पत्र प्रसंगाचे वर्णन वाचकांनी नक्कीच वाचावे.
अशाप्रकारे एकूण १५
प्रकरणांचे हे शिव चरित्रात्मक पुस्तक पंचफुला प्रकाशन संस्थेने वाचकांसाठी पुढे
आणले आणि नाममात्र दरात सर्वसामान्यांसाठी हे कौतुकास्पद म्हटले पाहिजे.
प्रास्ताविकात लेखक
म्हणतात, “आम्हाला शिवरायांचा प्रताप आठवायला सांगितला,त्यांचे रूप आठवायला
सांगितले,त्यांचा साक्षेपही आठवायला सांगितला परंतु आजपर्यंत कुणीच आम्हाला
शिवरायांनी दिलेला विचार कधीच आठवायला सांगितलेला नाही.” हे अगदी सत्य आहे आणि
म्हणूनच ‘शिवरायांचा आठवावा विचार’ हा ग्रंथ लिहून आपल्याला एक नवीन दृष्टीकोन
देतात. सर्वात क्षेत्रात मराठे अग्रेसर होते. त्यांनी आज पुन्हा नव्या जोमाने झेप
घ्यावी. जगभर प्रगतीसाठी हिंडावे आणि पराक्रमाचे तमासे दाखवावेत हाच या पुस्तकाचा
गर्भितार्थ आहे.
संस्कृतीच्या गप्पा मारणाऱ्यांनी
लक्षात घ्यावे की संस्कृतीचे निर्माते, रक्षणकर्ते हे मराठेच होते. भारतनाट्यम या
नृत्य प्रकारचे जनकच छ.संभाजी महाराज आहेत. अनेक खाद्य पदार्थांची निर्मिती
मराठ्यांनी केली. प्रस्तुत ग्रंथात ‘संभाजी सारम, साम्भाराम आणि सांबर’ हे प्रकरण
मला फार आवडले. कारण एक प्रगतीशील संस्कृती जन्माला घालणारे शिवरायांचे वारसदार आज
कुठे आहेत अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे आणि याचे भीषण चित्रण लेखकाने या प्रकरणात
केलेलं आहे.
म्हणून शिवप्रेमींनी आणि
वास्तव वादी वाचकांनी हा ग्रंथ जरूर वाचावाच. मोटीव्हेशनल ट्रेनर साठीही हे पुस्तक
तेवढेच महत्वाचे आहे जेवढे इतिहासकारांसाठी. चला तर मग आता सर्वांनीच शिवरायांचा
विचार आठवूया.
-नितीन सावंत
विभागीय अध्यक्ष
जगद्गुरू तुकोबाराय साहित्य
परिषद
(पुस्तकासाठी संपर्क- पंचफुला प्रकाशन, औरंगाबाद. मो-९४ २२ ५२ ८२ ९० )

No comments:
Post a Comment