Wednesday 2 July 2014

मराठा ही जात नसेल तर...


     

     आरक्षणाचे जनक असणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या पूर्व संध्येला शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागास असणाऱ्या मराठा समाजाला राज्य सरकारने १६ % आरक्षण जाहीर केले. जाहीर केले म्हणजे शासन निर्णय काढला नाही फक्त जाहीर केले. त्यामुळे त्याची अंमलबजावणी होणे लांबच आहे. परंतु राज्य सरकारच्या या निर्णयाचा निषेध करणाऱ्या व्यक्तीमध्ये निषेध कोणत्या मुद्द्यावरून करावा यात एक वाक्यता दिसून येत नाहीये. म्हणून ‘जातीचे मराठे हे उच्चवर्णीय पासून ते सरंजामदार आहेत’ इथपासून ते ‘मराठा नावाची कोणतीही जात नसून तो एक भाषिक समूह आहे’ इथपर्यंत निषेध होत आहे. मराठा ही जातच नाही असे म्हणत माजी पत्रकार केतन तिरोडकर यांनी राज्य सरकारने जाहीर केलेल्या मराठा आरक्षणाच्या निर्णयाला हायकोर्टात जनहित याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. आरक्षण लागूच झाले नसता त्याला आवाहन देणे म्हणजे लग्नाच्या अगोदरच खावटीसाठी अर्ज दाखल करण्यासारखा हा प्रकार होय. तर दुसरीकडे राज्यातील सत्ता ही केवळ मराठा जातीसाठीच राबवली जात आहे असे म्हणत या निर्णयाला विरोध होत आहे. (दै. दिव्य मराठी, दि. ३० जून २०१४, मराठा-राष्ट्रातील महादलीत, ले-प्रमोद चुंचूवार)
      मुळात जर मराठा नावाची कोणतीही स्वतंत्र जात नसून भाषिक समूह असेल तर तिला जात मानून कसे काय टीकेची झोड उठवली जात आहे, हे समजण्यास वाव नाही. केतन तिरोडकर यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यापूर्वी १६ मार्च २०१४ ला दै. दिव्य मराठीत सतीश वाघमारे यांनीही त्यांच्या “कशाला पाहिजे आरक्षण?” या लेखात ‘महाराष्ट्रात मराठा नावाची स्वतंत्र जात अस्तित्वात हाय का नाही हाच वादाचा विषय आहे’ असे लिहित मराठा जातीबद्दल प्रश्न चिन्ह निर्माण केले होते. सदरील लेखात सतीश वाघमारे यांनी ब्रिटीश इतिहासकार ग्रांट डफ यांच्यापासून ते राजर्षी शाहू महाराज यांच्या पर्यंतचे दाखले देत ‘मराठा नावाची स्वतंत्र जात मानण्याऐवजी ब्राह्मणेत्तर जातींपैकी पुढारलेल्या जातींना मराठा नावाने संघटीत करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता’ असे विधान केले होते. या सर्व संदर्भांना ग्राह्य मनात सतीश वाघमारे यांनी ‘२० व्या शतकाच्या प्रारंभापर्यंत तरी मराठा नावाची स्वतंत्र जात मानण्यात येत होती काय?’ असा प्रश्न उपस्थित केला होता. १९३१ च्या जनगणनेत मराठा जातीच्या नावाखाली एकूण नऊ जातींचा समावेश करण्यात आला असल्याचेही त्यांनी मांडले आहे. याचाच अर्थ वाघमारे सरांनी अत्यंत अभ्यासपूर्ण संदर्भ देत मराठा जातीच्या जात असण्यावर प्रश्न चिन्ह उभे केले आहे. तेव्हा प्रमोद चुंचूवार यांनी मराठ्यांना महादलीत ठरविण्यापूर्वी मराठे नेमके कोण व त्यांचा मूळ व्यवसाय काय याचे तपशीलवार संदर्भ दिले असते तर त्यांच्या लेखाचे सामाजिक मूल्य अजूनच वाढले असते.
      बरे सतीश वाघमारे यांनी तरी मराठा नावाखाली समाविष्ट असणाऱ्या नऊ जातींची नावे दिली असती तर दिव्य मराठीच्या वाचकांच्या ज्ञानात भर पडली असती. जर मराठा ही स्वतंत्र जात नसून पुढारलेल्या जातींचा समूह असेल तर आज रोजी स्वतःला मराठा म्हणवून घेणारे वगळल्यास बाकीच्या आठ पुढारलेल्या जातींचे काय झाले? पुढारलेल्या जातींपैकी आजची तथाकथित मराठा जात वगळता बाकीच्या पुढारलेल्या जातींना अचानक मागासलेपणाचे डोहाळे का व कसे लागले? मग ज्या निकषांच्या आधारे मराठा समूहातील पुढारलेल्या इतर जातींना मागास ठरवले गेले तेच निकष मराठा संज्ञेखाली एकाकी पडलेल्यांना का लागू होऊ नयेत? जात हे भारतीय समाजाचे वास्तव आहे. २० व्या शतकाच्या प्रारंभापर्यंत जर मराठा ही स्वतंत्र जात मानण्यात येत नव्हती तर २० व्या शतकाच्या पूर्वी आजच्या मराठ्यांची गणना कोणत्या जातीत होत होती? या प्रश्नांची उत्तरे सतीश वाघमारे यांनी नाही तरी किमान प्रमोद चुंचूवार यांनी एक जबाबदार पोलिटिकल ब्युरो हेड म्हणून द्यायला हवी होती.
    आजची सामाजिक परिस्थिती पाहता स्वतःला मराठा मानणाऱ्या जात समूहाचे माराठेत्तर समाजात फक्त कुणबी जातीशीच बेटी संबंध प्रस्थापित होतात. (प्रस्तुत लेखक हा तथाकथित ९६ कुळी मराठा जातीतील असून त्यांची बायको ही विदर्भातील कुणबी जातीतील आहे.) ज्यांचा बेटी व्यवहार होतो त्यांची जात एक असते हा समाजशास्त्रीय सिद्धांत आहे. कारण स्वजातीतच मुलगी देणे (endogamy) हे जात बळकट करण्यास कारणीभूत आहे म्हणूनच शेकडो वर्षांपासून जातीव्यवस्था अस्तित्वात आहे. बेटी बंदी हे जातीला स्वतंत्र अस्तित्व देणाऱ्या सप्तबंदिंपैकी एक बंदी आहे हे समाजशास्त्रीय वास्तव आहे. मग मराठा ही जात नाही तर मग काय आहे? तर “मराठा हे अस्मितेचे किंवा स्वाभिमानाचे प्रतिक आहे. वास्तविक मराठा अशी कुठली जातही नाही आणि पारंपारिक व्यवसायही नाही.” (आरक्षण नको, जातीचे दाखले हवे, ले-प्रा. दत्तात्रय परभणे, मराठा आरक्षण: भूमिका आणि वास्तव. पृ.१०४.) जात म्हणजे उदार्निर्वाहाचा पिढीजात धंदा होय. जात हे फक्त मागासलेपणाच्या Identification चे साधन आहे. स्पष्ट आहे ‘मराठा’ असा कुठलाही वडिलोपार्जित पेशा किंवा पारंपारिक धंदा नाही. मग आज स्वताला मराठा मानणाऱ्या समूहाचा पिढीजात धंदा हा शेती म्हणजेच ‘कुणबिक’ हाच आहे. म्हणजे आजचे मराठे हे त्यांचे कुणब्यांशी असणाऱ्या बेटी संबंध आणि पारंपारिक कुणबिक व्यवसाय या वरून मुळातच इतर मागासवर्गीय आरक्षणाचे लाभधारक ठरतात.
      ‘१९५२ मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख यांनी ते केंद्रात मंत्री असताना मराठा समाजाला कुणबी प्रवर्गात टाकावे या हेतूने मुंबई येथे मराठा मंदिर मध्ये महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या प्रमुख प्रतिनिधींची बैठक बोलावली होती, परंतु मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी आम्ही क्षत्रिय आहोत; कुणबी-मागासवर्गीय कसे म्हणून घ्यावे? असे म्हणून पंजाबरावांच्या सूचनेला विरोध केला. तथापि त्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या विदर्भातील मराठ्यांनी त्यांची सूचना स्वीकारली. ज्याचा लाभ त्यांच्या भावी पिढ्यांना झाला.’ (आरक्षणा बाबत दिशाभूल करणारे दावे- डी.आर.शेळके, दै. दिव्य मराठी, दि. २०१४) यावरून असे सिद्ध होते की पंजाबराव देशमुखांच्या सांगण्यावरून विदर्भातील कुणबी झालेला वर्ग १९५२ पर्यंत मराठा म्हणूनच जगत होता. आजही मराठवाड्यातील मराठ्यांचे विवाह विदर्भातील कुणब्यांशी का होतात याचे गमक हेच आहे. विदर्भातील तत्कालीन मराठ्यांनी जो लवचिक व्यवहारवाद स्वीकारला तो मराठवाड्यातील व पश्चिम महाराष्ट्रातील तत्कालीन मराठ्यांना दाखवता आला नाही ही खचितच खेदाची बाब आहे. परंतु यावरून आजचे मराठे हे कुणबीच नाहीत असा याचा अर्थ काढल्या जाऊ शकत नाही.

     आमचे म्हणणेही हेच आहे की मराठा ही जातच नाही, ती वृत्ती आहे. राष्ट्रगीतात तर ‘मराठा’ हा शब्द प्रांतवाचक आहे. तेव्हा राज्य सरकारने जास्त आढेवेढे न घेता आजच्या मराठ्यांना  त्यांच्या पारंपारिक व्यवसायाच्या आधारे ‘मराठा-कुणबी’, ‘कुणबी-मराठा’ किंवा ‘कुणबी’ जातीचे दाखले द्यावेत. कारण इतर मागासवर्गीय असणे हा मराठ्यांचा घटना दत्त अधिकार आहे.

1 comment: