Friday 11 July 2014

गंगाधरपंत ते अभय कुलकर्णी

     
दिनांक ५ जुलै २०१४ रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील शिंदी सिरसगाव येथे मोठाच अनाहूत प्रसंग घडला. अभय प्रभाकर कुलकर्णी या मनोरुग्ण विकृताला अल्पवयीन मुलींची छेड काढतो म्हणून जमावाने बेदम चोप दिला. खरे तर मुलींची छेड काढण्याचे प्रकार  आजकाल सर्रास घडत असताना या कुलकर्णी काकांच्या छेडछाडीवर अवघा लेख लिहिण्याची गरज काय? असा प्रश्न वाचकांना पडणे साहजिक आहे. परंतु अल्पवयीन मुलींची छेड काढत असताना कुलकर्णी काकांनी जो मार्ग अवलंबला तो भल्या भल्यांची मती गुंग करायला लावणारा आहे. पोलिसांपासून ते सामाजिक अभ्यासकांपर्यंत सगळ्यांनाच विचार करायला लावणारा आहे. कारण अभय प्रभाकर कुलकर्णी हा मनोरुग्ण स्त्री वेश परिधान करून अल्पवयीन मुलींची छेड काढत होता. अभय प्रभाकर कुलकर्णी हा वाळूज औद्योगिक वसाहतीतील बागला ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या बी.जी.लाईन इलेक्ट्रिकल्स या कंपनीत इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. अल्पवयीन मुलींची छेड काढण्यापूर्वी तो कधी साडी तर कधी पंजाबी ड्रेस परिधान करायचा. सोबतच महिलांसारखा नट्टापट्टा करायचा. नाकात नथ घालायचा अन कारमध्ये येऊन स्वतःच्या मुलींच्या वयाच्या शाळकरी मुलींना त्रस्त करून सोडायचा. गावात पाचवीपर्यंतच शाळा असल्यामुळे शिंदी सिरसगावच्या मुली पुढील शिक्षणासाठी पोळ रांजणगाव येथील शाळेत पायी पायी जात असतात. त्या रस्त्यावर गेल्या दीड महिन्यापासून दर बुधवारी आणि शनिवारी हा कुलकर्णी स्वतःच्या मालकीची महिंद्रा लोगनकार घेऊन घेऊन यायचा. शाळकरी मुली दिसताच तो कार थांबवायचा आणि मुलींकडे पाहून अश्लील हातवारे करायचा. ‘चला कारमध्ये बसा मी शाळेत सोडतो’ असे म्हणायचा. त्याच्या या ‘रामदासी’ वागण्याने शाळकरी मुलींमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली होती. म्हणून त्यांनी अखेर ही बाब घरच्यांना सांगितली. त्यामुळे पालकांनी सापळा रचून, पाठलाग करून अभय कुलकर्णी या विकृताला बेदम चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेने पोलीसही चांगलेच चक्रावले आहेत. कारण कुलकर्णी हा उच्चशिक्षित असून सधन कुटुंबातील आहे. त्याचे लग्न झालेले असून त्याची बायको दोन मुलांसह नाशिक येथे राहते.
     एका नव्या सामाजिक समस्येला तोंड फोडणारे हे प्रकरण आहे. पोलिसांना या विक्षिप्त कुलकर्णीला ताब्यात घेतले आहे. कुलकर्णीला काय सजा व्हायची ते कायद्या प्रमाणे होईलही. परंतु महिलांचा वेश परिधान करून मुलींची छेड काढण्याच्या नवीनच प्रकारामुळे पालकांमध्ये व मुलींमध्ये मात्र सध्या दहशतीचे वातावरण पसरले आहे.
    यापूर्वीही २००६ मध्ये असाच प्रकार उत्तर प्रदेशची राजधानी असणाऱ्या लखनौ शहरात उघडकीस आला होता. कुलकर्णी महाशयांनी वेश बदलून मुलींसोबत छेडछाड केली तर लखनौच्या देवेंद्रकुमार पांडा नामक महाशयांनी विविध महिलांशी अनैतिक संबंध ठेवण्यासाठी वेश पालटाचे नाटक सुरु केले. उपरोक्त अभय कुलकर्णी हा इंजिनियर आहे तर लखनौ येथील देवेंद्रकुमार पांडा हा पोलीस ऊपमहानिरीक्षक (Rules and manuals)  आहे. या पोलीस महाशयांना म्हणे १९९१ मध्ये साक्षात भगवान कृष्णाने दर्शन दिले होते. तेव्हापासून पंडा महाशयांच्या मनात कृष्णा विषयी अपार भक्ती आणि प्रेम निर्माण झाले. म्हणून पंडा यांनी कृष्णाला आपले तन,मन,धन अर्पण करण्याचा निर्णय घेतला. परंतु एवढे सगळे अर्पण करूनही पांडाची ‘भक्ती’ जेव्हा ‘शमली’ नाही तेव्हा त्यांनी स्वताला कृष्णसखी राधेचा अवतार मानून भांगेत सिंदूर, नाकात नथ, पायात पैंजण तसेच ओठाला लीपस्टीक अशी रंगभूषा स्वीकारली. पांडाचे स्त्रीच्या शृंगाराने सजलेले रूप भगवान श्रीकृष्णाला किती भावले हे काही कळायला मार्ग नाही परंतु त्यांना राधेच्या रुपात बघायला मात्र ठिकठिकाणी बघ्यांची गर्दी जमत होती. स्त्रियांसारखा नट्टापट्टा करणारे पांडा अंगावर गणवेश मात्र पोलीस अधिकाऱ्याचा घालतात. पांडू हवालदार आपणा सर्वांना परिचित असला तरी उत्तर प्रदेशचे लोक मात्र ‘पांडा हवालदार’चे रूप याची देही याची डोळा साठवत आहेत. विशेष बाब म्हणजे अभय कुलकर्णी सारखे पंडा देखील विवाहित असून त्यांनाही दोन मुले आहेत. त्यातला मोठा मुलगा मुंबई विभागाच्या आयकर कार्यालयात आयआरएस पदावर असून तो विवाहित आहे. तर दुसरा मुलगा अविवाहित असून बैन्ग्लोर येथे अभियंता आहे. गेल्या कित्येक वर्षापासून पांडा स्वताला कृष्णसखी राधेचा अवतार मानत आहेत. त्यांची बायको विना उर्फ सीमा हिचे म्हणणे आहे की-“ माझे पती आपल्या पतीकर्तव्यापासून दूर गेले असून रासलीला या धार्मिक सत्संगाच्या आड अनेक महिलांशी अनैतिक कृत्य करतात. त्यामुळे आपल्या पत्नीला लागणाऱ्या मुलभूत गरजा ते पुरवित नाहीत.” (संदर्भ-राधेची बाधा-प्रा. अशोक राणा)  यालाच म्हणतात ‘घरची नागडी अन बाहेरचीला लुगडी’. स्वतःला राधेचा अवतार मानणाऱ्या पांडावर श्रीकृष्णाचे प्रेम आहे की नाही ते श्रीकृष्णच जाणोत परंतु पांडा मात्र स्वतःवर प्रेम प्रदर्शन करत स्वतःलाच ‘आय लव यू सुंदरी’ म्हणतो. मानसोपचार तज्ञांच्या म्हनण्यानुसाय पंडा हे उन्माद विकृतीचे बळी आहेत.        
     खरे तर पुरुषाने महिलांचा वेश परिधान करणे समाजाला जरी नवीन असले तरी इतिहासाला मात्र असे कुलकर्णी-पांडा हमखास भेटतात. ज्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाईचे नाव वीरांगना म्हणून घेतले जाते तिच्या नवऱ्या संबंधीची अशीच काहीशी परंतु सामान्य लोकांना माहित नसलेली माहिती ‘माझा प्रवास’ या गोडसे भटजी लिखित पुस्तकात आलेली आहे. प्रस्तुत पुस्तकात आलेल्या माहिती संदर्भात महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार आपल्या प्रस्तावनेत म्हणतात-“गोडसे भटजी प्रत्यक्ष महाराणी लक्ष्मीबाई झासीवाली यांच्या पदरी काही दिवस होते. झासीचा सर्व प्रसंग त्यांनी डोळ्यांनी पहिला आणि अनुभविला.” (पृष्ठ क्र.६, प्रस्तावना, दत्तो वामन पोतदार, माझा प्रवास) आता गोडसे भटजींनी पुस्तकात लिहिलेले सर्वच्या सर्व अनुभव स्वतः पाहिलेले आणि अनुभवलेले असल्यामुळे आणि त्यावर महामहोपाध्यायी शिक्का बसल्यामुळे ते किती अस्सल असतील याची कल्पना एव्हाना वाचकांना आलीच असेल. माझा प्रवास या पुस्तकात ‘झाशिवालीचे बालपण’ नावाचे तिसरे प्रकरण आहे. (पृष्ठ क्र. ५१) त्यात झाशी संस्थानचा राजा गंगाधरपंत यांची पहिली बायको आजारी पडून मरण पावल्यामुळे त्यांना दुसरा विवाह करण्याची इच्छा उत्पन्न झाल्याचे लिहिले आहे. जर सुस्वरूप असेल तर गरीब घरातील मुलगी करण्याची तयारीही गंगाधरपंतांनी दाखवली होती. परंतु त्यांना मुलगी द्यायला गरीबातील गरीब व्यक्तीही धजावत नव्हती याचे कारण देताना गोडसे भटजी लिहितात-“ गरीब गरीबाच्या मुली सुरूप चांगल्या गोत्रासी पडणाऱ्या अशा बहुत पाहिल्या, परंतु कोठे जमेना. याचे कारण गंगाधर बाबा हा लौकिकात आठ प्रकारचे षंढ आहेत, त्या प्रमाणे हा राजा षंढ आहे. गंगाधर बाबाचे आचरण असे होते की, आपले वाड्यात माडीवर दोहोचोहो रोजी पुरुष वेश टाकून स्त्रीचा वेश घ्यावा. पैठणी नेसून जरीकाठी चोळी अंगात घालीत असे. मस्तकावर शेंडी फारच मोठी राखिली होती व काही कृत्रिम केश लाऊन सुगंधी तेले लाऊन वेणी घालीत असे. कधी सर्व वेणीतील नाग घालून पाठीवर सोडलेली असे. कधी खोपाही वेणीस असे. मूद वगैरे अलंकार सर्व घालीत असे. गळ्यात गोट्याचे पेंडे व गुजराथी ठुसी वगैरे गळसऱ्याही घालून सारी व मोहराची माळ कंठा व मोत्यांच्या माळा घालून हातात गोट पाटल्या व बांगड्या व नाकांत नाथ व पायांत तोडेजोडवी वगैरे सर्व स्त्रियांचे अलंकार जडावाचेसू II घालून स्त्रियांबरोबर बोलणे वगैरे करीत असे. अशा कारणावरून गरीब लोक असा वर पाहून देणे त्यापेक्षा पाण्यात लोटणे हे चांगले असे बोलत.” गोडसे भटजींच्या या ‘आंखो देखा हाल’ वरून एखादी स्त्री सुद्धा लाजेल एवढे अलंकार लक्ष्मीबाईचा नवरोबा घालत होता हे लक्षात येते. अभय कुलकर्णी प्रकरणामुळे इतिहासाची पाने का चाळावी लागली याचे उत्तर वाचकांना मिळालेच असेल.
     गंगाधर पंतांच्या अशा वागण्यामुळे गरिबातला गरीब देखील आपली मुलगी पाण्यात ढकलून देऊन मारून टाकलेली बरी पण अशा षंढ असणाऱ्या राजाला देणे योग्य नाही असा विचार करायचा. मग लक्ष्मीबाईच्या पित्याची अशी काय मजबुरी होती की त्यांनी लक्ष्मीबाईला गंगाधरपंत सारख्या ‘मर्दाच्या’ स्वाधीन केले? पुढे गोडसे भटजी लिहितात-“ शास्त्रात आठ प्रकारच्या लेखणापूर्वक व्याख्या आहेत त्याप्रमाणे सचेतन पुरुषाचे सिस्न हातात धरून खेळ केला म्हणजे त्या षंढास चेतना व्हावी हा एक प्रकार त्यातच आहे. हा प्रकार या राजास असावा. आणि हेच खरे, कारण प्रथम स्त्रीला एक पुत्र जाहाला होता. ती स्त्री व्यभिचारिणी नव्हती, पतिव्रता साध्वी होती असे सर्व सांगतात. याजवरून राजा पुरुष आहे, असे गरीब लोक म्हणणारे त्याचे गोत्रासी व टीपणासी पडू नये. हा राजा बहुत करून महिन्याचे महिन्यास स्त्रीयांसारखा एकीकडे बसून अस्पर्शदशा तीन दिवस भोगून चवथे दिवसे नाहाणाचा समारंभ मोठा करीत असे. नाहाणे जाहाले म्हणजे पलंगावर निजून पलंगाखाली अग्नी ठेऊन केश वळवीत असे.” स्वजातीतील लोकांना चेतना मिळावी म्हणून भटांनी लक्ष्मीबाईचा खोटा इतिहास लिहिला परंतु तिच्या नवऱ्याला मात्र भलत्याच मार्गाने चेतना मिळत असलेली वाचली की विवेकबुद्धी जागी असणार्यांची बुद्धी चेतनाहीन झाल्या शिवाय राहत नाही. लक्ष्मीबाई सारख्या स्त्रीला याच कारणामुळे तर मर्दानी म्हटले जात नाही ना? ते काहीही असो, कागदी का होईना पण तटावरून घोडा फेकण्याची वेळ लक्ष्मीबाई वर का आली? याचे उत्तर गंगाधरपंतला आडमार्गाने मिळणाऱ्या चेतनेत आहे. खरे तर असल्या विकृत इतिहासाला सोनेरी पाने म्हणून मिरविणाऱ्या पुस्तकांना काडी लाऊन चेतवून दिले पाहिजे. (येथे चेतवून देण्याचा अर्थ पेटवणे म्हणजेच जाळणे असा घ्यावा.)
     गंगाधरपंतांनाच महिलांचे वस्त्र परिधान करण्याचे वेड होते असे नाही तर त्या पूर्वीही राष्ट्रगुरु रामदास यांनी गंगाधरपंत, देवेंद्रकुमार पंडा आणि अभय कुलकर्णी यांना मागे टाकतील असे चाळे दस्तुरखुद्द शिष्यीनिंशी केलेले आहेत. रामदासांच्या शिष्यांमध्ये बालविधवा स्त्रियांचाही भरणा होता. विशेषतः कऱ्हाडची अक्काबाई व मिरजेची वेणूबाई या दोन विधवा महिला रामदासांच्या खास मर्जीतल्या होत्या. त्या दोघी विधवा तरुणी कामिनी होत्या असे न. र. फाटक यांनी लिहिले आहे. रामदासाचा वेणूबाईवर एवढा जीव होता की “कृष्णावेणीच्या वाळवंटात एकदा वेणूबाईचे वस्त्र वाळत असल्याचे पाहून ते मेखळेप्रमाणे धारण केले, असे समर्थ प्रतापचे निवेदन आहे.(स. प्रताप उल्लास ११ पण ७१) ते त्यांच्या अंगावर सतत अकरा दिवस होते. वेणाबाईच्या लुगड्याची मेखळा अंगावर अकरा दिवस वागवीणाऱ्याबद्दल लोकांच्या अंगात विकल्पाचे वारे संचारल्यास त्यात दोष कोणाचा? ” एखाद्या स्त्रीवर प्रेम दाखवण्यासाठी तिचेच वस्त्र परिधान करण्याची जगावेगळी तऱ्हा राष्ट्रगुरू रामदासाने शोधून काढलेली दिसते. बाजारातून दोन रुपयांचे फुटाणे आणण्याच्या अविर्भावात तुझ्यासाठी चंद्र-तारे आणीन म्हणणारे प्रेमवीर अनेक पहिले होते परंतु जिच्यावर प्रेम आहे तिचेच कपडे घालून I LOVE YOU वेणू ”  म्हणनारा फक्त ब्रह्म्कुलोत्पन्न रामदासाच निपजू शकतो. योगायोग म्हणजे रामदासांचे वास्तव्य नाशिकलाच होते तर अभय कुलकर्णीही नाशिकचाच. जय जय रघुवीर समर्थ !!!
     अशीच पण जरा वेगळ्या प्रकारची विकृती विनायक दामोदर सावरकर या तथाकथित स्वातंत्र्यविरालाही होती. परंतु अभय कुलकर्णी, गंगाधरपंत आणि रामदास यांच्या सारखे महिलांचे वस्त्र परिधान न करताही सावरकरांनी त्यांच्या वाट्याला आलेली स्त्रीची भूमिका प्राण ओतून हुबहू वाटविली. सावरकरांच्या या भूमिकेबद्दल  FREEDOM AT MID NIGHT (Larry Collins &Dominique Lapierre ) या इंग्रजी ग्रंथाच्या आधारे आम्ही आमच्या ‘जेम्स लेन प्रकरणातील ब्रह्मराक्षस’ या ग्रंथात लिहिले आहे. “विनायक दामोदर सावरकर याला कित्येक वर्ष अफूचे (opium) व्यसन होते आणि तो समलिंगी व्यक्तींशी संबंध ठेवीत होता. नथुराम गोडसे याने ब्रह्मचारी राहण्याचे व्रत घेतले होते. परंतु त्यापूर्वी त्याला एकाच प्रकारचे लैंगिक संबंध माहित होते. ते म्हणजे समलिंगी संबंध. आणि या संबंधामध्ये त्याचा सहकारी होता त्याचा राजकीय गुरु सावरकर.” १८५७च्या समरातून कुणाला कोणती चेतना मिळाली माहित नाही परंतु सावरकरांनी गंगाधरपंतांकडून ‘की घेतले न व्रत आम्ही अंधतेने’ म्हणत तर वरील प्रेरणा घेतली नसेल ना? बांधवांनो लैंगिक विकृतीचा इतिहास हा असा वलयांकित आहे. अभय कुलकर्णी दोषी आहेच परन्तु प्रत्येक कालखंडात असे कुलकर्णी एका ठराविक जात समूहात का उत्पन्न होत आहेत हा समाजशास्त्रीयांसमोरचा मोठा प्रश्न आहे.
काय आहे हा प्रकार? :
पुरुषाने तथाकथित पुरुषी वस्त्र न परिधान करता स्त्रियांची वस्त्रे घालणे हा काय प्रकार आहे असा प्रश्न पडणे साहजिक आहे. याचे उत्तर आपल्याला वैद्यकशास्त्र देते. वैद्यकीय अभ्यासक्रमात Forensic medicine and Txicology नावाचा विषय आहे. या पुस्तकात Sexual Perversions म्हणजे लैंगिक विकृती नावाचे प्रकरण आहे. स्त्रीशी शारीरिक संबंध न ठेवता लैंगिक सुख मिळविणाऱ्या प्रत्येक मार्गाला लैंगिक विकृती म्हटले जाते. उपरोक्त विकृतीला Transvestism असे म्हणतात. ही विकृती असणाऱ्या व्यक्तीला आपण विरुद्धलिंगी व्यक्तिमत्वाने ओळखले जावे अशी तीव्र इच्छा असते. म्हणून अशा विकृतीने ग्रस्त असणारे पुरुष महिलांचे वस्त्र परिधान करून लैंगिक आनंद मिळविण्याचा प्रयत्न करतात. गोडसे भटजींनी वर्णन केलेला गंगाधरपंत असो किंवा न. र. फाटकांनी वर्णिलेला रामदास असो अथवा राधेने बाधलेला देवेंद्रकुमार पंड्या, अभय कुलकर्णी असोत ही सर्व मंडळी या लैंगिक विकृतीने ग्रस्त असल्याचे आपणास वाटत नाही काय?

    वर आलेली सर्व मंडळी ही समाजाच्या एका विशिष्ट जातीतील आणि स्तरातील आहेत ही बाब या प्रकरणाचे गांभीर्य आणखीनच वाढवणारी आहे. समाजासमोर चुकीचे आदर्श ठेवल्यामुळे तर असे प्रकार घडत नाहीत ना? धार्मिक ग्रंथात बऱ्याच विकृती तथा महिलांची अवमानकारक वर्णने आढळतात. उदाहरणच द्यायचे झाले तर धार्मिक ग्रंथांतील अश्वमेघ यज्ञाची वर्णने असोत किंवा यम आणि यमी या भाऊ बहिणींच्या संवादांची वर्णने असणारे ग्रंथ असोत किंवा वि. का. राजवाडे लिखित ‘भारतीय विवाह संस्थेचा इतिहास’ हा ग्रंथ असेल किंवा पेशव्यांच्या काळात खेळल्या जाणारे ‘घटकन्चूकी’ सारखे खेळ असोत की त्याकाळातील स्त्रियांच्या नग्न धावण्याच्या शर्यती असोत. असल्या अभिरुचीहीन ग्रंथांच्या प्रभावामुळे तर असे प्रकार किंवा अशी विकृत मानसिकता तयार होत नसेल ना? कारण उपरोक्त उदाहरणे ही धार्मिक सत्तेवर आपलाच अधिकार सांगणाऱ्या वर्गातली आहेत. याचा समाजशास्त्रीयदृष्ट्या विचार करण्याची गरज अभय कुलकर्णी प्रकरणामुळे निर्माण झालेली आहे. या प्रकारांमुळेच कदाचित वीर उत्तमराव मोहिते यांनी अध्यात्माला ‘नपुंसकाचे स्वप्न रंजन’ असे म्हटले असावे. तेव्हा धर्मग्रंथांचा आणि ऐतिहासिक साधनांचा योग्य तो अभ्यास करून शासन प्रशासनाने या प्रवृत्तीला आळा घालणे गरजेचे आहे. अन्यथा रामदासी विकृती असणारे असे कुलकर्णी प्रत्येक कालखंडात तयारच होत राहतील.                  

Wednesday 2 July 2014

मराठा ही जात नसेल तर...


     

     आरक्षणाचे जनक असणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या पूर्व संध्येला शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागास असणाऱ्या मराठा समाजाला राज्य सरकारने १६ % आरक्षण जाहीर केले. जाहीर केले म्हणजे शासन निर्णय काढला नाही फक्त जाहीर केले. त्यामुळे त्याची अंमलबजावणी होणे लांबच आहे. परंतु राज्य सरकारच्या या निर्णयाचा निषेध करणाऱ्या व्यक्तीमध्ये निषेध कोणत्या मुद्द्यावरून करावा यात एक वाक्यता दिसून येत नाहीये. म्हणून ‘जातीचे मराठे हे उच्चवर्णीय पासून ते सरंजामदार आहेत’ इथपासून ते ‘मराठा नावाची कोणतीही जात नसून तो एक भाषिक समूह आहे’ इथपर्यंत निषेध होत आहे. मराठा ही जातच नाही असे म्हणत माजी पत्रकार केतन तिरोडकर यांनी राज्य सरकारने जाहीर केलेल्या मराठा आरक्षणाच्या निर्णयाला हायकोर्टात जनहित याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. आरक्षण लागूच झाले नसता त्याला आवाहन देणे म्हणजे लग्नाच्या अगोदरच खावटीसाठी अर्ज दाखल करण्यासारखा हा प्रकार होय. तर दुसरीकडे राज्यातील सत्ता ही केवळ मराठा जातीसाठीच राबवली जात आहे असे म्हणत या निर्णयाला विरोध होत आहे. (दै. दिव्य मराठी, दि. ३० जून २०१४, मराठा-राष्ट्रातील महादलीत, ले-प्रमोद चुंचूवार)
      मुळात जर मराठा नावाची कोणतीही स्वतंत्र जात नसून भाषिक समूह असेल तर तिला जात मानून कसे काय टीकेची झोड उठवली जात आहे, हे समजण्यास वाव नाही. केतन तिरोडकर यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यापूर्वी १६ मार्च २०१४ ला दै. दिव्य मराठीत सतीश वाघमारे यांनीही त्यांच्या “कशाला पाहिजे आरक्षण?” या लेखात ‘महाराष्ट्रात मराठा नावाची स्वतंत्र जात अस्तित्वात हाय का नाही हाच वादाचा विषय आहे’ असे लिहित मराठा जातीबद्दल प्रश्न चिन्ह निर्माण केले होते. सदरील लेखात सतीश वाघमारे यांनी ब्रिटीश इतिहासकार ग्रांट डफ यांच्यापासून ते राजर्षी शाहू महाराज यांच्या पर्यंतचे दाखले देत ‘मराठा नावाची स्वतंत्र जात मानण्याऐवजी ब्राह्मणेत्तर जातींपैकी पुढारलेल्या जातींना मराठा नावाने संघटीत करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता’ असे विधान केले होते. या सर्व संदर्भांना ग्राह्य मनात सतीश वाघमारे यांनी ‘२० व्या शतकाच्या प्रारंभापर्यंत तरी मराठा नावाची स्वतंत्र जात मानण्यात येत होती काय?’ असा प्रश्न उपस्थित केला होता. १९३१ च्या जनगणनेत मराठा जातीच्या नावाखाली एकूण नऊ जातींचा समावेश करण्यात आला असल्याचेही त्यांनी मांडले आहे. याचाच अर्थ वाघमारे सरांनी अत्यंत अभ्यासपूर्ण संदर्भ देत मराठा जातीच्या जात असण्यावर प्रश्न चिन्ह उभे केले आहे. तेव्हा प्रमोद चुंचूवार यांनी मराठ्यांना महादलीत ठरविण्यापूर्वी मराठे नेमके कोण व त्यांचा मूळ व्यवसाय काय याचे तपशीलवार संदर्भ दिले असते तर त्यांच्या लेखाचे सामाजिक मूल्य अजूनच वाढले असते.
      बरे सतीश वाघमारे यांनी तरी मराठा नावाखाली समाविष्ट असणाऱ्या नऊ जातींची नावे दिली असती तर दिव्य मराठीच्या वाचकांच्या ज्ञानात भर पडली असती. जर मराठा ही स्वतंत्र जात नसून पुढारलेल्या जातींचा समूह असेल तर आज रोजी स्वतःला मराठा म्हणवून घेणारे वगळल्यास बाकीच्या आठ पुढारलेल्या जातींचे काय झाले? पुढारलेल्या जातींपैकी आजची तथाकथित मराठा जात वगळता बाकीच्या पुढारलेल्या जातींना अचानक मागासलेपणाचे डोहाळे का व कसे लागले? मग ज्या निकषांच्या आधारे मराठा समूहातील पुढारलेल्या इतर जातींना मागास ठरवले गेले तेच निकष मराठा संज्ञेखाली एकाकी पडलेल्यांना का लागू होऊ नयेत? जात हे भारतीय समाजाचे वास्तव आहे. २० व्या शतकाच्या प्रारंभापर्यंत जर मराठा ही स्वतंत्र जात मानण्यात येत नव्हती तर २० व्या शतकाच्या पूर्वी आजच्या मराठ्यांची गणना कोणत्या जातीत होत होती? या प्रश्नांची उत्तरे सतीश वाघमारे यांनी नाही तरी किमान प्रमोद चुंचूवार यांनी एक जबाबदार पोलिटिकल ब्युरो हेड म्हणून द्यायला हवी होती.
    आजची सामाजिक परिस्थिती पाहता स्वतःला मराठा मानणाऱ्या जात समूहाचे माराठेत्तर समाजात फक्त कुणबी जातीशीच बेटी संबंध प्रस्थापित होतात. (प्रस्तुत लेखक हा तथाकथित ९६ कुळी मराठा जातीतील असून त्यांची बायको ही विदर्भातील कुणबी जातीतील आहे.) ज्यांचा बेटी व्यवहार होतो त्यांची जात एक असते हा समाजशास्त्रीय सिद्धांत आहे. कारण स्वजातीतच मुलगी देणे (endogamy) हे जात बळकट करण्यास कारणीभूत आहे म्हणूनच शेकडो वर्षांपासून जातीव्यवस्था अस्तित्वात आहे. बेटी बंदी हे जातीला स्वतंत्र अस्तित्व देणाऱ्या सप्तबंदिंपैकी एक बंदी आहे हे समाजशास्त्रीय वास्तव आहे. मग मराठा ही जात नाही तर मग काय आहे? तर “मराठा हे अस्मितेचे किंवा स्वाभिमानाचे प्रतिक आहे. वास्तविक मराठा अशी कुठली जातही नाही आणि पारंपारिक व्यवसायही नाही.” (आरक्षण नको, जातीचे दाखले हवे, ले-प्रा. दत्तात्रय परभणे, मराठा आरक्षण: भूमिका आणि वास्तव. पृ.१०४.) जात म्हणजे उदार्निर्वाहाचा पिढीजात धंदा होय. जात हे फक्त मागासलेपणाच्या Identification चे साधन आहे. स्पष्ट आहे ‘मराठा’ असा कुठलाही वडिलोपार्जित पेशा किंवा पारंपारिक धंदा नाही. मग आज स्वताला मराठा मानणाऱ्या समूहाचा पिढीजात धंदा हा शेती म्हणजेच ‘कुणबिक’ हाच आहे. म्हणजे आजचे मराठे हे त्यांचे कुणब्यांशी असणाऱ्या बेटी संबंध आणि पारंपारिक कुणबिक व्यवसाय या वरून मुळातच इतर मागासवर्गीय आरक्षणाचे लाभधारक ठरतात.
      ‘१९५२ मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख यांनी ते केंद्रात मंत्री असताना मराठा समाजाला कुणबी प्रवर्गात टाकावे या हेतूने मुंबई येथे मराठा मंदिर मध्ये महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या प्रमुख प्रतिनिधींची बैठक बोलावली होती, परंतु मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी आम्ही क्षत्रिय आहोत; कुणबी-मागासवर्गीय कसे म्हणून घ्यावे? असे म्हणून पंजाबरावांच्या सूचनेला विरोध केला. तथापि त्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या विदर्भातील मराठ्यांनी त्यांची सूचना स्वीकारली. ज्याचा लाभ त्यांच्या भावी पिढ्यांना झाला.’ (आरक्षणा बाबत दिशाभूल करणारे दावे- डी.आर.शेळके, दै. दिव्य मराठी, दि. २०१४) यावरून असे सिद्ध होते की पंजाबराव देशमुखांच्या सांगण्यावरून विदर्भातील कुणबी झालेला वर्ग १९५२ पर्यंत मराठा म्हणूनच जगत होता. आजही मराठवाड्यातील मराठ्यांचे विवाह विदर्भातील कुणब्यांशी का होतात याचे गमक हेच आहे. विदर्भातील तत्कालीन मराठ्यांनी जो लवचिक व्यवहारवाद स्वीकारला तो मराठवाड्यातील व पश्चिम महाराष्ट्रातील तत्कालीन मराठ्यांना दाखवता आला नाही ही खचितच खेदाची बाब आहे. परंतु यावरून आजचे मराठे हे कुणबीच नाहीत असा याचा अर्थ काढल्या जाऊ शकत नाही.

     आमचे म्हणणेही हेच आहे की मराठा ही जातच नाही, ती वृत्ती आहे. राष्ट्रगीतात तर ‘मराठा’ हा शब्द प्रांतवाचक आहे. तेव्हा राज्य सरकारने जास्त आढेवेढे न घेता आजच्या मराठ्यांना  त्यांच्या पारंपारिक व्यवसायाच्या आधारे ‘मराठा-कुणबी’, ‘कुणबी-मराठा’ किंवा ‘कुणबी’ जातीचे दाखले द्यावेत. कारण इतर मागासवर्गीय असणे हा मराठ्यांचा घटना दत्त अधिकार आहे.