Tuesday, 21 July 2015

तुका म्हणे जरी गळे अहंकार, तरी वसे घर नारायण

वचन ते नाही तोडत शरीर Iभेदत अंतरा वज्रा ऐसे II 1 II
काही न सहावे काशाही कारणे I संधेह नीधान देह बळी II 2 II
नाही शब्द मुखी लागत तिखट I नाही जड होत पोट त्याने II 3 II
तुका म्हणे जरी गळे अहंकार  Iतरी वसे घर नारायण II 4 II

           संत तुकारामांनी अभंगाच्या माध्यमातून जीवनातील विविध अंगांना, विविध क्षेत्रांना स्पर्श केले आहे. मागच्या अभंगात आपण एखाद्याशी वाद कसा घालावा आणि त्याला गोडीला कसे आणावे हे पहिले होते. या अभंगात तुकारामांनी वाईट-साईट, विचार-पाचार न करता कसेही मनावर ओरखडे उमटवत बोलण्याने काय होते हे अत्यंत मार्मिक शब्दांत सांगितले आहे. तसे पाहायला गेले तर तुकोबांचा भर हा आयुष्यभर मानवाच्या मनाच्या शुद्धतेवरच राहिलेला आहे. मोह, माया, लोभ, मत्सर इ. तामोगुनांचा त्याग केला की ना लागे सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण अशी मानवाची अवस्था होऊन बसते आणि त्याला मग लौकिक पूजा करण्याची गरजही भासत नाही. म्हणून ते  म्हणतात- ‘करावी पूजा मनेची उत्तम, येथे लौकीकाचे काय काम?’ तेव्हा मनुष्याला वागण्या बोलण्यापासून ते कष्ट करण्यापर्यंत तुकोबांनी अभंगातून मार्गदर्शन केले आहे. आपल्या आजूबाजूला विशेषतः खेड्या मध्ये अगदी छोट्या छोट्या कारणावरून घरामध्ये किती कुरबुरी होतात हे तुकारामांनी प्रत्यक्ष पहिले होते. शेतीच्या बांधाच्या वादावरून सख्खे भाऊ एकमेकांचे मुडदे पडताना पाहून तुकोबांचे मन कासावीस झाले नसल्यास नवल. अशावेळी आपल्या विचार न करता बोलण्यामुळे कसा अनर्थ होतो हे अभंगातून सांगताना तुकोबा म्हणतात ‘वचन ते नाही शरीरा तोडत, अंतरा भेदत वज्रा ऐसे’ म्हणजे तसे पाहायला गेले तर एखाद्याने आपल्याला टोचून बोलले किंवा घालून पडून बोलले तर आपल्या शरीराला काही भोके पडत नाहीत, आपले शरीर काही तुटत नाही, भंगत नाही किंवा त्याच्यावर कसल्याही बाह्य जखमा होत नाहीत. परंतु आपले अंतर्मन जे आहे ते मात्र एखाद्या कठीणातल्या कठीण वज्राने भेदावे तसे भेदले जाते. त्याच्यावर ओरखडे उमटले जातात. त्याला तडे जातात. आपले अंतर्मन हे घायाळ होऊन जाते आणि आपण कासावीस होऊन जातो. असे मनावर वज्रासारखा आघात करणारी जी माणसे असतात हे कठीण वज्रासारखे आघात करणारे का बरे बोलत असतात? कारण त्यांच्या मनी अत्यंत अहंकार भरलेला असतो. ते काहीही झाले तरी त्यांच्या मनाविरुद्ध एकही गोष्ट सहन करू शकत नाहीत. इतरांच्या बाबतीत त्यांचा असलेला संशय, त्यांच्या मनी वसत असलेला संदेह ते मेल्याशिवाय जात नाही हे सांगताना तुकोबा म्हणतात- ‘काहीही न साहवे कशाही कारणे, संदेह निधान देह बळी.’ अशाप्रकारे केवळ मर्यादेपेक्षा जास्त अहंकार असल्यामुळे ही मंडळी आपल्या मनाविरुद्ध एकही गोष्ट सहन करून शकत नाहीत. त्यांच्या मनातला इतरांविषयी असलेला संदेह, संशय मेल्याशिवाय जात नाही एवढे हे लोक अहंकारी असतात. म्हणतात ना सुंभ जळाला तरी पिळ जात नाही म्हणून तशी या अहंकारी लोकांची अवस्था असते.
    तसे पाहायला गेले तर अशा कठोर शब्दाने, मनाला आरपार भेदून काढणाऱ्या शब्दांनी खरे तर बोलणाऱ्याचे तोंड भाजून निघत नाही, असे शब्द काही आपल्या जिभेला मिरची सारखे तिखट लागत नाहीत किंवा असे शब्द, वचन बोलल्याने आपले काही पोटही जड होत नाही. परंतु समोरच्या व्यक्तीच्या अंतर्मनाला झालेल्या जखमा कशा भरून काढायच्या? ‘नाही शब्द मुखी लागत तिखट, नाही होत जड पोट त्याने.’ शब्दांच्या होणाऱ्या परिणामांची जाणीवच नसल्यामुळे अशी व्यक्ती काहीच्या बाही बोलत असते. म्हणून तुकोबाराय म्हणतात ‘तुका म्हणे जरि गळे अहंकार, तरी वसे घर नारायण.’ म्हणजे अशा कठीण वज्रासारखे बोलायला कारणीभूत ठरणाऱ्या अहंकाराला जरी आपण आपल्यातून काढून फेकले, त्याच्या पासून आपली सुटका करून घेतली, आपल्यातील अहंकाराचे उच्चाटन केले, त्याला समूळ नष्ट केले तर आपल्याला असे शब्द उच्चारण्याची वेळच येणार नाही आणि आपल्या पोटी अहंकारच उरलेला नसल्यामुळे आपल्या मनात कुणाबद्दल कसलाच संदेह, कोणताच संशय उरणार नाही आणि पर्यायाने आपण कठीण वज्रासारखे कटू वचन, कटू शब्द वापरणे बंद करून टाकू. म्हणून ज्या घरात अहंकार गळून गेलेली माणसे वावरतात त्या घरात खऱ्या अर्थाने सुख, शांती आणि समृद्धी तर असतेच पण खऱ्या अर्थाने अशा घरातच नारायणाचा म्हणजे साक्षात पांडुरंगाचा वास असतो.
     अशाप्रकारे आपले बीजच जर का शुद्ध झाले तर मग या बीजापोटी येणारी फळे सुद्धा रसाळ आणि गोमटी असतात हे त्यांनी त्यांच्या एका वेगळ्या अभंगात स्पष्ट केलेले आहे.
शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी
मुखी अमृताची वाणी देह वेचावा कारणी
सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगाजळ
तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती


  -डॉ.बालाजी जाधव, औरंगाबाद.
(१६/०७/२०१५)



~~@@@~~

1 comment: